मुंबई - पठाणचा ज्वर अद्यापही कमी व्हायला तयार नाही. बॉक्स ऑफिसवर झेंडे रोवत प्रेक्षकांच्या मनाचाही ताबा पठाणने घेतला आहे. जगभरातून चित्रपटाला अमाप प्रेम मिळत आहे. अशावेळी शाहरुख खानने एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे ,ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ दिल्ली विद्यापीठातला आहे . यात विद्यार्थी आणि शिक्षिका मिळून पठाणच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
शाहरुखने म्हटले - 'एज्युकेशनल रॉकस्टार' - शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करत त्याला छान कॅप्शनही दिली आहे. त्याने लिहिलंय, 'आम्हाला शिकवू शकतील आणि आमच्यासोबत मजा करू शकतील असे शिक्षक आणि प्राध्यापक मिळणे किती भाग्यवान आहे. ते सर्व शैक्षणिक रॉकस्टार्स!' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अँड मेरी कॉलेजच्या कॉमर्स विभागाचा आहे. हा व्हिडिओ वाणिज्य विभागाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कॅप्शनसह शेअर करण्यात आला होता ज्यात लिहिले आहे, 'एका मजेशीर दिवसाचे वैशिष्ठ्य म्हणजे जेएमसीचे प्रतिभावान प्राध्यापक कॉमक्युमेन २३च्या फ्लॅशमॉबमध्ये सामील झाले.'
पठाणच्या गाण्यावर प्रेक्षकांचा डान्स - विशेष म्हणजे, चित्रपटगृहांमध्ये जेव्हाही हे गाणे वाजले तेव्हा अनेक वयोगटातील चाहत्यांनी 'झूम जो पठाण'च्या या ट्यूनला आपलेसे केले आणि भान हरपून यावर ताल धरला. याचे असंख्य व्हिडिओ देशभरातील चित्रपटगृहातून आजवर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी हा व्हिडिओ प्रेम आणि उत्साहाने पाहिला. एकाने लिहिले, 'पठाण के साथ पुरी दुनिया झूम रही है हक से एसआरके.' 'तुझ्यामुळेच मी चित्रपटात आलो आणि तुमचा सिनेमा आवडतो! शाहरुख खानला प्रेम आणि आदर,' असे आणखी एकाने लिहिले.
शाहरुखसाठी पठाणचे यश महत्त्वाचे - 'पठाण' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर शाहरुखने बहुप्रतिक्षित यशाची चव चाखली. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात हजार कोटींची कमाई केली आहे. पठाण हा चित्रपट शाहरुख खानसाठी यशदायी ठरणे खूप आवश्यक होते. कारण त्याचे गेल्या काही वर्षापूर्वी सलग चित्रपट फ्लॉप ठरत आले होते. त्याचा अखेरचा झिरो हा चित्रपट सुपरफ्लऑप झाला होता. त्यानंतर शाहरुखने मनन चिंतन केले आणि काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कोविडचा काळ सुरू झाल्याने सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. दरम्यान त्याने पठाण चित्रपटाची निर्मिती सुरू ठेवली होती. त्यामुळे या चित्रपटाला मिळालेले आजचे यश त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या, शाहरुखने या थ्रिलरमध्ये अॅक्शन स्टाईलचा प्रयत्न केला, जो यशराज चित्रपटांद्वारे तयार केलेल्या हेरगिरी विश्वाचा एक भाग आहे. दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनीही या चित्रपटात काम केले आणि प्रेक्षकांचे प्रेम मिळवले.
हेही वाचा - Alia Bhatt Photo : गुपचूप काढले आलिया भट्टचे फोटो, अभिनेत्रीने थेट मुंबई पोलिसांकडे केली तक्रार