नवी दिल्ली - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चतुरस्त्र अभिनेता सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी मित्रांसोबत अखेरची होळी अत्यंत आनंदात खेळली होती. त्यांचा होळीचा उत्सव पाहून त्यांच्यासोबत एवढी मोठी दुर्घटना घडली असेल यावर कोणाचाही विश्वास बसत नाही, पण वेळ काय परवानगी घेऊन येत नाही असे म्हणतात. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे चित्रपट जगत आणि त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आहे. सतीश कौशिक यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.
पीएम मोदींनी ट्विट करत लिहिले, 'तेजस्वी चित्रपट अभिनेता सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले, ते एक उत्कृष्ट कलाकार होते, त्यांनी आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली, त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनासाठी धन्यवाद. त्यांचे काम प्रेक्षकांच्या हृदयात सदैव जिवंत राहील, त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती संवेदना, ओम शांती'.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सतिश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यानी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'आपल्या सर्वांगसुंदर अभिनय, दिग्दर्शन, निर्मितीच्या माध्यमातून हिंदी चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी मन विषण्ण करणारी आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे... भावपूर्ण श्रद्धांजली.'
दरम्यान बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील दिग्गज सतिश कौशिक यांना श्रध्दांजली वाहत आहेत. कॉमेडियन कपिल शर्मा यानेही कौशिक यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याने लिहिलंय, 'तुमची खूप आठवण येत राहिल, सतिश कौशिक पाजी, इश्वर तुम्हाला आपल्या चरणाजवळ स्थान देओ. तुम्ही तर या जगाला अलविदा म्हटले. विश्वासच बसत नाही, आपण लवकरच भेटणार होतो आणि बरेच काही ऐकायचे होते. माहिती नव्हते की ही भेट पुन्हा होणार नाही. सर्वांवर प्रेम करणारा आणि आनंद वाटणारा व्यक्ती आमच्यात आज राहिला नाही.'