मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानला सोशल मीडियाच्या रोषाला सामोरे जावे लागणे हे काही नवीन नाही. लाल सिंग चड्ढा या त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना, सोशल मीडियावर एका गटाने आमिरच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू केली आहे. त्याच्या 2018 च्या ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या रिलीजनंतर तो परत एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे.
अलीकडे लाल सिंग चड्ढावर बहिष्कार घलण्यासाठीचा हॅशटॅग ( #BoycottLaalSinghCaddha ) वारंवार ट्विटर ट्रेंडमध्ये होत आहे. आमिरने पूर्वी केलेले भारतात असहिष्णुता वाढत असल्याबद्दलचे विधान पुन्हा खोदून काढून त्याला ट्रोल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीची करिनाची काही वादग्रस्त विधानेही ऑनलाइन होत आहेत.
आमिर खानच्या आगामी चित्रपटाबद्दल नेटिझन्सने संताप व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, जेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मे महिन्यात ट्रेलर लॉन्च केला तेव्हा हाच हॅशटॅग ट्रेंड करत होता. रिलीजपूर्वी त्याच्या चित्रपटाबद्दलचा द्वेष त्याला त्रास देत आहे का असे आमिरला विचारले असता सुपरस्टार म्हणाला की समाजाच्या एका वर्गामध्ये कसा गैरसमज आहे हे जाणून घेणे त्याला नक्कीच 'दुखावत' असल्याचे तो म्हणाला होता.
ट्विटरवर लाल सिंग चड्ढाच्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल बोलताना आमिर म्हणाला, "हो, मला वाईट वाटतं. तसेच, मला वाईट वाटतं की जे काही लोक हे बोलत आहेत, त्यांना वाटत की माझ्या मनात भारताबद्दल प्रेम नाही. त्यांना तसं वाटतं पण ते असत्य आहे."
मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या आमिरने त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये अशी विनंतीही त्याच्यावर नाराज असलेल्यांना केली आहे. द्वेष करणाऱ्यांना विनंती करत आमिर खान म्हणाला, "कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. कृपया माझा चित्रपट पहा."
आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढा चित्रपटामध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - एआर रहमानने गायलेले 'पोन्नियिन सेल्वन'चे पहिले मंत्रमुग्ध गाणे रिलीज