मुंबई - Oli Ki Suki Movie : समाजप्रबोधन करणं हा चित्रपटनिर्मितीचा उद्देश असू शकतो. मात्र प्रेक्षकांना आपल्या कलाकृतीतून उपदेशाचे डोस न पाजता साध्या सरळ, मनोरंजक पद्धतीनं एखादा विषय मांडणं हे आव्हान असतं. असंच एक आव्हान दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी 'ओली की सुकी' चित्रपटातून पेलण्याचा प्रयत्न केलाय. शीर्षकावरुन हा चित्रपट विद्यार्थीदशेतल्या मुलांवर बेतलेला असल्याचं लक्षात येतं. यात मांडलेला शून्यापासून ध्येय गाठण्याची उर्मी देणारा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा चित्रपटाच्या निर्मात्यांचा विश्वास आहे. तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहकरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर आदी कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, हा विचार चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याची दिग्दर्शकाची प्रतिक्रिया आहे. 'ओली की सुकी' येत्या 4 जानेवारी 2024 रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
'ओली की सुकी' चित्रपटाची कहाणी : 'ओली की सुकी' चं कथानक झोपडपट्टीत राहणाऱ्या किशोरवयीन मुलांभोवती फिरणारी आहे. आयुष्यात भरकटण्याच्या वाटेवर असताना या मुलांच्या आयुष्यात राधिकाताईचा प्रवेश होतो आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, मारामारी जीवनाचा घटक झालेल्या मुलांच्या आयुष्याला राधिकाताईच्या रुपात 'परीसस्पर्श' होतो. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात 'ओली की सुकी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
'ओली की सुकी'- शुगरकोटेड कॅप्सुल : अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या चित्रपटाबाबत म्हटलं, ''या चित्रपटातून आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आम्ही देणार आहोत.'' या चित्रपटाची कहाणी जरा हटके आहे, त्यामुळं आता अनेकजण या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर हा अनेकांना आवडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहे. एका यूजरनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''या चित्रपटाचा ट्रेलर हा सुंदर आहे'' त्यानंतर दुसऱ्या एकानं लिहिलं, ''या चित्रपटाद्वारे काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. अशा अनेक कमेंट या ट्रेलरवर येत आहेत.
हेही वाचा :