मुंबई - बॉलिवूडमधील कुशल नृत्यांगणाचा विचार करायला गेले तर नोरा फतेही ही एक उत्तम डान्सर आहे. आजवर तिच्या अनेक चित्रपटातील आणि लाईव्ह परफॉर्मन्समधील डान्सनी हे वेळोवेळी सिध्द केले आहे. नोराने तिच्या सर्वोत्तम डान्स मूव्हने अनेकांची मने जिंकली. नोराला डान्स करताना पाहून चाहत्यांचा आनंद गगनाला भिडतो. परंतु, नोराच्या डान्सबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
‘झलक दिखला जा’ या डान्स शोला जज करणारी नोरा फतेही अडचणीत आली आहे. तिच्या नृत्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, नोरा फतेही बांगलादेशची राजधानी ढाका येथे आयोजित कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. मात्र, तिला या कार्यक्रमात येण्याची परवानगी मिळालेली नाही. परवानगी न मिळण्यामागे एक विचीत्र कारण दिले जात आहे. बांगलादेश सरकारने डॉलर वाचवण्यासाठी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी, बांगलादेशच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये लिहिले आहे की, जागतिक परिस्थिती पाहता परकीय चलनाचा साठा राखण्याच्या उद्देशाने नोराला कार्यक्रमात परफॉर्म करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे कारण ऐकून नोराचे चाहते मात्र चक्रावले आहेत.
वुमेन्स लीडरशिप कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेत्रीला नृत्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यासोबतच तिला तेथे पुरस्कार देण्याचे निमंत्रणही पाठवण्यात आले होते. परंतु, दरम्यानच्या काळात, सांस्कृतिक मंत्रालयाने परकीय चलन साठा कमी होत असताना केंद्रीय बँकेच्या डॉलर पेमेंटवरील निर्बंधांचा संदर्भ देत नोराच्या बांग्लादेश दौऱ्याला मनाई केली आहे.
हेही वाचा - चार दोस्तांच्या प्रेक्षणीय सेकंड इनिंगचा सुंदर प्रवास असलेला उंछाईचा ट्रेलर रिलीज