मुंबई - 'जक्कल' ही मराठी वेब सिरीज 1970 च्या दशकात पुण्यात झालेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडाच्या रहस्याचा उलगडा करणार आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली, मध्यमवर्गीय कुटुंबातली चार मुलं असा निर्घृण गुन्हा करायला लागल्यावर कुठपर्यंत जाऊ शकतात, हे या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना कळेल.
गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पावर काम करणाऱ्या विवेक वाघने हा शो तयार केला आहे. याच विषयावर आधारित 2021 मध्ये वाघ यांना सर्वोत्कृष्ट शोध माहितीपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. जिओ स्टुडिओज, शिवम यादव आणि ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रॉडक्शनचे कार्तिकी यादव यांनी या मराठी वेब सिरीजची निर्मिती केली आहे.
या वेब सिरीज बद्दल बोलताना निर्माते विवेक वाघ म्हणाले, "पुण्यासारखे शहर जे पेन्शनर्सचे नंदनवन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जात होते, त्या काळात दोन आपत्कालीन घटना घडल्या. एक राष्ट्रीय आणीबाणी आणि दुसरी जोशी-अभ्यंकर हत्याकांड. त्यामुळे पुण्यातील लोक घाबरले."
जोशी-अभ्यंकर खून सत्रामध्ये हे व्यावसायिक कला शाखेचे विद्यार्थी राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम कान्होजी जगताप आणि पुण्यातील मुनावर हारुण शहा यांनी जानेवारी 1976 ते मार्च 1977 दरम्यान केलेल्या दहा खूनांचा समावेश होतो. गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी 27 नोव्हेंबर 1983 रोजी फाशी देण्यात आली होती.
अनुराग कश्यपच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनात 2003 मध्ये आलेला 'पांच' हा चित्रपटही जोशी-अभ्यंकर मालिका हत्याकांडावर आधारित होता. के के मेनन, तेजस्विनी कोल्हापुरे, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्य आणि जॉय फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मात्र त्याच्या भयानक आशयामुळे प्रदर्शित होऊ शकला नव्हता.
'जक्कल' ही वेब सिरीज ऑक्टोबर 2023 मध्ये लॉन्च होईल.
हेही वाचा - भारतीय चित्रपट उद्योगात बॉलीवूड, टॉलीवूड अशी विभागणी थांबवण्याचे करण जोहरचे आवाहन