मुंबई - Lokshahi Poster released : मराठी चित्रपटसृष्टीला राजकीय चित्रपटांची जुनी परंपरा आहे. याच परंपरेतला आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'लोकशाही' चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली आहे. संजय अमर दिग्दर्शित या चित्रपटाचे'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड' प्रस्तुतकर्ता आहेत. 15 जानेवारी रोजी 'मकर संक्रांती'च्या मुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. चित्रपटाचं शीर्षक आणि पोस्टरमधल्या छायाचित्रांवरुन हा सर्व राजकारणाचा मामला आहे, हे वेगळं सांगण्याची गरज भासू नये.
'लोकशाही' चित्रपटाची स्टारकास्ट : चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले अशी स्टारकास्ट आहे. 'फर्जंद' मधून मराठी प्रेक्षकांना ओळखीचा झालेला अमराठी कलाकार अंकित मोहन सुद्धा यात प्रमुख व्यक्तिरेखा साकारतोय. विचारमग्न चर्येचे डॉ. मोहन आगाशे, समोरच्या जमावाला हात जोडून अभिवादन करणारे समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, अंकित मोहन एकमेकांचे समर्थक की विरोधक यांचा अंदाज चाणाक्ष प्रेक्षक लाऊ शकतात. मात्र, हे सर्व कलाकार जनता जनार्दनासमोर हात जोडून काहीतरी आवाहन करत असावेत, असं किमान पोस्टर तरी सांगतं. चित्रपटात नेमकं काय आहे, याचं उत्तर मात्र येत्या 9 फेब्रुवारीला म्हणजे 'लोकशाही' प्रदर्शित झाल्यावरच मिळेल.
'लोकशाही'- निवडणुकीचं 'महाभारत' : 'लोकशाही' चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रांची आणि त्यांच्यातल्या सत्तासंघर्षाची आजच्या म्हणजे कलियुगाच्या संदर्भातून आठवण येईल, असा दावा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ श्री.सुशीलकुमार अग्रवाल यांनी केलाय. जगातल्या मोठ्या लोकशाही देशात राहणाऱ्या आपल्याला पदोपदी 'लोकशाहीला' ठेच पोहोचवली जात असल्याचं पाहावं लागतं. लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्या राजकारण्यांचं आणि त्यांच्या भ्रष्ट राजकारणाचं चित्रपटातून मांडलेलं प्रखर वास्तव प्रेक्षकांना पसंत पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, 'लोकशाही' चित्रपटाबद्दलच्या सोशल मीडिया पोस्टवर पोस्टवर कॉमेंट करत चित्रपटरसिक अभिनेता समीर धर्माधिकारीला शुभेच्छा देताना दिसत आहेत.
हेही वाचा :