मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिख समुदायाबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. पंजाबमध्ये ज्या हिंसक घटना काही दिवसापासून सुरू आहेत त्यापार्श्वभूमीवर कंगनाचे हे विधान आले आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने एक पोस्ट लिहिून आपण दोन वर्षापूर्वी केलेले भाष्य खरे ठरत असल्याचे म्हटलंय.
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'पंजाबमध्ये आज जे काही घडतंय त्याबद्दल मी दोन वर्षापूर्वीच भाकित केले होते, त्यावेळी अनेक केसेस माझ्यावर झाल्या. माझ्या गाडीवर पंजाबमध्ये हल्ला करण्यात आला, परंतु तेच घडले जे मी म्हटले होते. खलिस्तानी शिखांना आता त्यांची भूमिका निश्चित केली पाहिजे आणि हेतुही स्पष्ट केला पाहिजे,' असे कंगनाने म्हटलंय.
यापूर्वीही कंगनाने केले होते वादग्रस्त विधान - कंगनाने यापूर्वीही अनेकदा अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिने दोन फोटो शेअर करुन खलिस्तानी आणि शीख यांच्यातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाने यासोबत एक कमेंटही लिहिली होती पण नंतर तिने तिची पोस्ट डिलीट केली होती. या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले होते, 'खलिस्तानी ना शीख आहे ना शेतकरी. हे लोक लष्कर-ए-तैयबासारखे दहशतवादी आहेत. भारत सरकारने त्यांना दहशतवादी घोषित करावे. जर तुम्ही त्यांच्या बाजूने असाल तर तुम्हाला कळले पाहिजे की त्यांना काय हवे आहे... दहशतवाद आणि गृहयुद्ध...'
शेतकरी आंदोलनावर कंगनाची टीका - यापूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्तानीशी केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानी चळवळ म्हणून दाखवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
एकीकडे कंगना रणौतला सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र सतत बॉलिवूडमधील अनेक निर्माते, कलाकार यांवर टीका करणे आणि उजव्या विचारसरणीची पाठराखण करणे यामुळे ती सतत चर्चेत रहात आली आहे. आता तिने केलेले शिख समुदायाबाबतचे वक्तव्य पुन्हा वादग्रस्त ठरताना दिसत आहे. खरंतर आजच तिने सेल्फी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही याची खापर तिने निर्माता करण जोहरवर फोडले आहे. एकाच दिवशी सोशल मीडियावर असे दोन धमाके कंगनाने आज केले आहेत.