नवी दिल्ली Jackie Shroff : देशभरात गेल्या दोन दिवसांपासून एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे देशाचं नाव 'भारत' की 'इंडिया'! वीरेंद्र सेहवागपासून तर अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी यावर आपलं मत व्यक्त केलंय. आता अभिनेता जॅकी श्रॉफनं देखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही 'इंडियन' आहात हे विसरू नका : 'पूर्वी आपल्या देशाला भारत म्हटलं जायचं, बरोबर? माझं नाव जॅकी आहे. मात्र काही जण मला जॉकी म्हणतात, तर काही जण मला जकी म्हणतात. लोक माझं नाव बदलतात म्हणून मी बदलणार नाही. नुसतं नाव बदलेल, पण आपण नाही बदलणार. तुम्ही लोक देशाचं नाव बदलत राहता, पण तुम्ही 'इंडियन' आहात हे विसरू नका', असं जॅकी श्रॉफ म्हणाला. जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री दिया मिर्झा काल (५ सप्टेंबर) नवी दिल्लीतील 'प्लॅनेट इंडिया' मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यादरम्यान जॅकीनं हे वक्तव्य केलं.
हेही वाचा : Bharat Name History : ऋग्वेदापासून संविधानापर्यंत, असा आहे 'भारत'चा प्रवास; जाणून घ्या
अमिताभ बच्चन यांची पोस्ट : या आधी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टनं सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अमिताभ बच्चन यांनी 'X' वर पोस्ट करत हिंदीमध्ये लिहिलं, 'भारत माता की जय.' त्यांची ही पोस्ट इंडिया-भारत वादाच्या दरम्यान आली आहे. त्यावरुन असं दिसतं की बिग बींनी देशाचं नाव बदलण्याच्या बाजूनं पाठिंबा दर्शवला आहे.
देशाचं नाव बदललं जाण्याच्या चर्चांना उधाण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील जी २० शिखर परिषदेच्या अधिकृत मेजवानीसाठी दिलेल्या निमंत्रणात 'इंडिया' या शब्दाऐवजी 'भारत' वापरल्यानं वाद निर्माण झालाय. राष्ट्रपती कार्यालयानं दिलेल्या निमंत्रणात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत', असा उल्लेख आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात देशाचं नाव बदललं जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय.
नरेंद्र मोदी यांना 'इंडिया' या नावाची भीती वाटते : लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'इंडिया' या नावाची भीती वाटते. 'हिंदू हे नावही परदेशीयांनी दिलं आहे. मला वाटतं की स्वतः पंतप्रधानांना 'इंडिया' या नावाची भीती वाटते. विरोधी पक्षांनी ज्या दिवसापासून त्यांच्या युतीचं नाव 'इंडिया' ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून पंतप्रधान मोदींचा देशाच्या नावाबद्दलचा द्वेष वाढला आहे', असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.