मुंबई - Hrithik Roshan in Tiger 3 : सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट 'टायगर 3' मधून तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. त्याचा हा अॅक्शन पॅक अवतार पाहण्यासाठी चाहतेही उतावीळ झालेत. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
शाहरुख खानच्या 'पठाण' या अॅक्शन चित्रपटात जेव्हा सलमान खानची एन्ट्री झाली होती तेव्हा दोघांच्याही चाहत्यांनी थिएटर अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अशीच एन्ट्री 'टायगर 3' मध्ये शाहरुख खान करणार असल्याचं सांगितलं जातंय. आता या चित्रपटात 'वॉर' चित्रपटाचा नायक हृतिक रोशन उर्फ कबीरही झळकणार असल्याचं खात्रीलायक समजतंय.
फिल्म इंडस्ट्रीतील एका माहिती देणाऱ्याने सांगितले, 'आदित्य चोप्रानं YRF स्पाय युनिव्हर्समध्ये त्याच्या सुपर स्पाईसना एकत्र करण्याचा चंग बांधलाय. हे फार कुणाला माहिती नाही पण पठाणसोबत कबीरही 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. परंतु आदित्य चोप्रा कबीरला 'टायगर 3' मध्ये कोणत्या स्वरुपात दाखवणार आहे, याचा थांगपत्ता कोणालाच नाही. 'टायगर 3' जेव्हा 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होईल तेव्हाच याबद्दलचा उलगडा होणार आहे.'
आदित्य चोप्रानं यशराज चोप्रा फिल्म्सचं स्पाय युनिव्हर्स खूप हुशारीनं तयार केलंय. यामध्ये टायगर, पठाण आणि कबीर हे तीन भारतीय गुप्तहेर सर्वश्रेष्ठ होऊन जगावर राज्य करतील याची बांधणी तो करत आहे. सलमान खान 'एक था टायगर' चित्रपटातील टायगर हा स्पाय युनिव्हर्सचा असली बॉस आहे. यापूर्वी भारतीय सिनेमात कधीही न दिसलेलं गुप्तहेरांचं विश्व आणि सुपर-स्पाईज तयार करण्यासाठी यशराज फिल्म्सच्या वतीनं एक सुनियोजित आखणी करण्यात आलीय.
'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है'च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की तो 'वॉर'मधील कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान या दोन अधिक लार्जर-दॅन-लाइफ एजंट्सना त्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये समाविष्ट करू शकतो.
दरम्यान, यशराज फिल्म्सनंदेखील 'वॉर 2' ची घोषणा केली आहे. यामध्ये हृतिक रोशनसह कियारा अडवाणी आणि जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'वॉर 2'चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे.
हेही वाचा -
3. Uorfi Javed Viral Video : पोलिसांची बदनामी अंगलट, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल