सांगली - बंगला,गाडी आणि विमानाने फिरणे म्हणजे श्रीमंती नसून झाडा खाली बसून ऑक्सिजन मिळणे म्हणजे खरी श्रीमंती आहे,असे मत सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनामुळे श्रीमंतीची व्याख्या सगळ्यांना कळली असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. ते कवठेमहांकाळच्या अग्रणी-धुळगाव येथे वृक्षारोपण प्रसंगी बोलत होते.
"जैवविविधता उद्यान,वृक्ष लागवड शुभारंभ"
"एक फौजी,एक वृक्ष"या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेता सयाजी शिंदे आणि सागर कारंडे यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळच्या अग्रणी धुळगाव याठिकाणी झाला. सह्याद्री देवराई आणि वृक्षप्रेमी यांच्या माध्यमातून 25 एकरच्या माळरानावर जैवविविता उद्यान साकारण्यात येत आहे. यानिमित्ताने सयाजी शिंदे आणि सागर कारंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे विस्तिर्ण असे हे जैवविविधता असणारे उद्यान साकारण्यात येत आहे. वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक झाडे याठिकाणी प्रामुख्याने लावण्यात येणार आहेत.
"एक फौजी,एक वृक्ष"स्तुत्य उपक्रम...
या वृक्षारोपण प्रसंगी बोलताना अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले,अग्रणी -धुळगाव जे एक उजाड माळरान आहे,1972 च्या दुष्काळात याठिकाणी एक बंधारा झाला होता. त्यानंतर याठिकाणी झाडं का नाहीत,हा प्रश्न करण्यापेक्षा आपण काय करतोय, या भावनेतून याठिकाणी वृक्षलागवड करत आहोत. सहयाद्री देवराईच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात याठिकाणी हिरवीगार वनराई असेल, असा विश्वास व्यक्त करत,याठिकाणी देशासाठी शहीद झालेल्या फौजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी "एक फौजी,एक वृक्ष"ही संकल्पना देशातील पहिलीच असून खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
श्रीमंतीची व्याख्या आता कळली...
कोरोनाने आज श्रीमंतीची व्याख्या समजली आहे,बंगला,गाडी आणि विमानाने फिरणे म्हणजे केवळ श्रीमंती नसून जी झाडा खाली बसून 20 वेळा ऑक्सिजन घेऊ शकतो. त्याच्या एवढा श्रीमंत कोणी नाही,आणि हे काम झाडं करू शकतात. झाडाखाली बसल्याने आनंद मिळतो, इतकंच नव्हे तर गौतम बुद्धांना देखील झाडाखाली बसल्याने प्रचीती आली,त्यामुळे झाडाचे।महत्त्व खूप आहे,हे कोरोनामुळे आता सगळ्यांना कळले आहे ,असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
मग जीवन जगून काय उपयोग ..
सयाजी शिंदे यांच्या या सह्याद्री देवराई सोबत पहिल्यांदा जोडले गेलेले अभिनेता सागर कारंडे म्हणाले, वृक्ष लागवडीच्या मोहिमेशी जोडले गेल्याचा आपल्या खूप आनंद आहे आणि आज आपल्याकडे वेळ असल्यावर जर आपण झाडे लावण्याच्या उपक्रमात सहभागी झालो नाही,तर आपले जगून काय उपयोग, बाकीच्या गोष्टी ,फोटो वैगरे आपण काढतोच,पण या गोष्टीसाठी आपला चेहरा,प्रसिद्ध वापरली तर काय चुकले, ही फारचं चांगली गोष्ट असल्याची भावना अभिनेते सागर कारंडे यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
हेही वाचा - पाहा... दिल्लीतील शरद पवारांच्या बैठकीवर काय म्हणाले संजय राऊत