मुंबई : बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या चित्रपट 'गदर २'मुळे खूप चर्चेत आहे. सनी देओल २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा 'तारा सिंग'च्या रुपात रुपेरी पडद्यावर परतत आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर २' रिलीजसाठी सज्ज आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २००१ मध्ये आलेल्या 'गदर'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा पुन्हा एकदा तारा सिंग, सकीना आणि चरणजीत यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान २६ जुलै रोजी गदर-२ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आता २७ जुलै रोजी या चित्रपटामधील पुन्हा एक दमदार पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा दिसत आहेत.
'गदर: एक प्रेम कथा' चित्रपटाबद्दल : चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजे 'गदर: एक प्रेम कथा' मध्ये, तारा सिंगने आपली पत्नी सकीनाला परत आणण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली होती. दरम्यान आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तो मुलगा चरणजीतला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तान सीमा ओलांडताना दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट खूप जास्त बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. त्यामुळे आता 'गदर २'कडून हीच अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटामध्ये सनी हा आपल्या जुन्या 'अंदाजात' प्रेक्षकांचे मने जिंकण्यासाठी परत येत आहे.
'गदर-२' आणि 'ओ माय गॉड २' : ११ ऑगस्ट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार असणार आहे. 'गदर २' आणि अमित रॉय दिग्दर्शित अक्षय कुमारचा वादग्रस्त चित्रपट 'ओ माय गॉड २' देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ११ ऑगस्ट रोजी रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अॅनिमल' चित्रपट देखील रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता, परंतु 'अॅनिमल'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलेली. त्यामुळे हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :