मुंबई - हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, प्रभास स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर 'बजरंग बली' चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये देवदत्त नागे याला भगवान हनुमानाच्या रूपात ध्यानस्थ मुद्रेत दाखवले आहेत. चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनी पोस्टर शेअर करत एक उत्तम कॅप्शन लिहिले आहे, 'रामाचा भक्त आणि रामकथेचा आत्मा, जय पवनपुत्र हनुमान.
हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे - हनुमान हे रामायणातील अत्यंत शक्तीशाली, विराट असे व्यक्तीमत्व आहे. या भूमिकेसाठी ओम राऊतने देवदत्त नागे याची निवड केली आहे. देवदत्त हा जय मल्हार या मालिकेत खंडोबाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील त्याची भव्या देहयष्ठी डोळ्यात भरणारी होती. यापूर्वी ज्यांनी हनुमानाची भूमिका केली आहे त्यामध्ये अगदी दारा सिंग यांच्या पर्यंत शक्तीशाली अभिनेत्यांची निवड झाली होती. त्यामुळे देवदत्त हनुमानाच्या भूमिकेला नक्की न्याय देऊ शकेल असा विश्वास ओम राऊत आणि निर्मात्यांना वाटत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बिग बजेट चित्रपट - आदिपुरुष हा चित्रपट रामायणाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. यामध्ये राघव ही भूमिका बाहुबली स्टार प्रभास साकारत आहे. यामध्ये जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग, लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान काम करत आहेत. हा एक भव्य चित्रपट व्हिएफएक्सचा उत्तम उपयोग करुन बनवला जात आहे. ४०० कोटीचे बिग बजेट या चित्रपटावर खर्च होणार आहे. तान्हाजी या चित्रपटामुळे प्रसिध्दीस आलेल्या दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
आदिपुरुष रिलीजला विलंब - दसऱ्याच्या दरम्यान या चित्रपटाचा पहिला टिझर निर्मात्यांनी रिलीज केला होता. यातील पौराणिक पात्रे न पटल्याने त्यावर भारतातील तमाम लोकांकडून व संघटनांकडून विरोध झाला. वर्षानुवर्षे चित्रांमध्ये पाहिलेली श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमानाची प्रतिमा यात वेगळी वाटल्याने टीका सुरू झाली. त्यात भर म्हणून लंकेश ही रावणाची व्यक्तीरेखाही लोकांच्या पसंतीस आली नाही. सैफ अली खानच्या या व्यक्तिरेखेवर प्रचंड ट्रोल झाले. त्यामुळे या चित्रपटाचे ग्राफिक्स बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. या सर्व बदलामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले. अखेर आदिपुरुष यावर्षी जून महिन्यात १६ तारखेला हा चित्रपट देशात आणि विदेशात रिलीज होणार आहे.
हेही वाचा - प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर यांना झी नाट्यगौरव तर्फे मानवंदना