मुंबई - बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांचे क्रेडिट कार्ड वापरून सुमारे 4 लाख रुपयांचे फसवे व्यवहार झाल्याची घटना समोर आली आहे. तक्रारीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी कपूरच्या खात्यातून 3.82 लाख रुपये पाच फसव्या व्यवहारांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत बुधवारी मुंबईतील आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोनी कपूर यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे समजले आणि त्यांनी याबाबत बँकेकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. निर्मात्याने पोलिसांना सांगितले की, त्यांच्या क्रेडिट कार्डचे तपशील कोणीही मागितले नाहीत किंवा त्यांना याबाबत कोणताही फोन आला नाही. कपूर कार्ड वापरत असताना कोणीतरी डेटा मिळवला असल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांना आला. कपूर यांच्या कार्डचे पैसे गुरुग्राममधील एका कंपनीच्या खात्यात गेल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'बुढ्ढी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अमृता आरोराचे सडेतोड उत्तर, मैत्रिणींनीही दिली साथ