मुंबई - अभिनेत्री राकुल प्रीत सिंग सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांत काम करीत होती. बऱ्याच कन्नड, तामिळ, तेलगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने ‘यारियां’ या हिंदी चित्रपटामार्फत बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. येथे काही चित्रपट केल्यानंतर ‘दे दे प्यार दे’ मधील मध्यवर्ती भूमिकेतून रकुल ला प्रसिद्धी मिळाली आणि तिला बरेच चित्रपट मिळाले. ‘दे दे प्यार दे’ मध्ये तिने अजय देवगण सोबत काम केलं होतं आणि म्हणूनच अजय ने तिला तो दिग्दर्शित करीत असलेल्या ‘रनवे ३४’ मध्ये प्रमुख भूमिका ऑफर केली. या चित्रपटात भूमिका करण्याबद्दल सांगताना रकुल ने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांना सांगितले की, “‘रनवे ३४’ मधील माझे कॅरॅक्टर एकदम पॉवरफुल आहे. मला आर्मी बॅकग्राऊंड आहे आणि ‘युनिफॉर्म’ चे नेहमीच आकर्षण राहिले आहे. या चित्रपटांत मी ‘वर्दी’ मध्ये दिसणार आहे म्हणून माझ्या घरचे खूष आहेत. अर्थात मी सुद्धा युनिफॉर्म मध्ये भूमिका करताना वेगळ्याच विश्वात होते. अजय (देवगण) सरांनी जेव्हा मला कथा ऐकविली तेव्हाच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. मला अतिशय वेगळ्या भूमिकेत तुम्ही पाहाल. हा पहिला ‘एव्हिएशन थ्रिलर’ आहे आणि अजय सरांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. मी दोनेक वर्कशॉप्स केले ज्यात खऱ्या कॅप्टनने आम्हाला ३-४ दिवस ट्रेनिंग दिलं. खासकरून कॉकपीट मधील पॅनल कसे वापरावे हे फोड करून सांगितलं. मी सर्व ‘बटणांची’ माहिती नोंद करून ठेवली होती जेणेकरून सीन करताना माझ्याकडून भलतेच बटन दाबले जाऊ नये. तसेच वैमानिकांसाठी असलेली खास तांत्रिक भाषादेखील मी शिकले होते. (हसत) आता ते सर्व मी विसरली सुद्धा आहे.”
रकुल ची भूमिका असलेला ‘अटॅक’ नुकताच प्रदर्शित होऊन गेला आणि आता ‘रनवे ३४’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. “‘अटॅक’ ला म्हणावे तसे बॉक्स ऑफिस यश मिळाले नाही परंतु चित्रपटाच्या कॉन्सेप्टची स्तुती झाली. माझ्या कामाबद्दलही मला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. कदाचित ‘अटॅक’ च्या रिलीज प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला असेल. असो. आता ‘रनवे ३४’ येतोय, त्याबद्दल मी खूप एक्सआयटेड आहे. यात मी अतिशय भिन्न अवतारात दिसेन”, रकुलने सांगितले. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण सारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना रकुल म्हणाली, “बच्चन सरांसोबत काम करण्याचा अनुभव जीवनभर माझ्याबरोबर राहील. त्यांच्याबरोबर घालाविलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मोलाचा आहे. ते इतके गोड आहेत की काय सांगू. एके दिवशी सेटवर अमिताभ सरांनी सर्वांना बिस्किटं वाटली. माझ्याकडे आल्यावर त्यांनी विचारलं, ‘तू तर खाणार नसशीलच’. मी मानेनेच नाही म्हटले आणि ते निघून गेले. काही वेळाने ते परत आले आणि त्यांनी मला ड्राय फ्रुटस च्या ३ छोट्या बरण्या दिल्या. खरंतर त्यांनी असं काही करण्याची गरज नव्हती परंतु आधी म्हटल्याप्रमाणे ते खूप गोड आहेत. खरी गंमत तर पुढे आहे. त्या दिवशी माझ्या घरी काम करणारी मुलगी शूटिंग बघायला सेटवर आली होती आणि तिने हा सर्व प्रकार जवळून बघितला. तिने त्या ३ रिकाम्या बरण्या आमच्या स्वयंपाकघरात एका जागी व्यवस्थित ठेवल्या आहेत आणि येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाला ती त्या आवर्जून दाखविते हे सांगत की, ‘या अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या आहेत.’ ती त्या बरण्यांमध्ये काहीही भरत नाही परंतु त्या सर्वांच्या दृष्टीस पडतील अश्या जागी ठेवल्या आहेत. तिच्यासाठी ते तीन अवॉर्ड्स आहेत जणू.”
रकुल पुढे म्हणाली, “अजय सरांबद्दल सांगायचं झालं तर ते उत्तम अभिनेते तर आहेतच परंतु ते अप्रतिम दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांच्याकडे असलेला संयम आणि काम करताना ते घेत असलेली मेहनत पाहून या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत असे मी ठामपणे सांगेन. त्यांच्याकडे ‘टेक्निकल ब्रिलियंस’ आहे. त्यांनी कॉकपीट मध्ये ७ आणि कोर्ट रूम मध्ये ११ कॅमेरे लावून शूटिंग केलं. ते स्वतः अभिनेते असल्यामुळे त्यांना कल्पना आहे की तेच इमोशन्स पुन्हा पुन्हा देणे कलाकाराला कठीण असते. त्यांनी कलाकारांसाठी सर्व सोप्प करून ठेवलं आणि त्याचा परिणाम तुम्हाला चित्रपटात दिसेलच. अमित सरांकडून तर सर्वच काही शिकण्याजोगं आहे. त्यांची भाषेवरील पकड, आवाजाचे चढउतार, भूमिका साकारताना असलेला ‘ठहराव’ या गोष्टी कोणालाही वेड लावतील. या दिग्गजांसोबत काम करताना मी स्वतःला अजूनही चांगले काम करण्यासाठी उद्युक्त करीत होते. या दोन्ही सुपरस्टार्स कडून मी बरंच काही आत्मसात केले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जर का प्रेक्षकांनी कौल दिला की, रकुल अमिताभ आणि अजय पुढे नेटाने उभी राहिली आहे आणि तिने दोन सुपरस्टार्सच्या सानिध्यात न डगमगता उत्तम अभिनय केला आहे, तर त्या प्रतिक्रिया मला कुठल्याही अवॉर्ड सारख्याच असतील.”
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात ‘रनवे ३४’ चे (आधीचे नाव ‘मे डे’) शूटिंग सुरु करण्यात आले होते. सर्व काळज्या घेऊनही रकुल ला कोरोनाने पकडलेच. त्या अनुभवाबद्दल सांगताना रकुल म्हणाली, “अरे काय सांगू. अगदी सुरुवातीच्या काळातच मला कोरोना झाला. परंतु माझी फॅमिली फौजी फॅमिली आहे त्यामुळे ते घाबरले तर नाहीच, उलट मला त्यांनी सांगितलं ‘चल उठ, झोपून राहू नकोस’, म्हणत सकारात्मक ठेवलं. त्याच झालं होतं असं की चित्रीकरण सुरु झाल्यानंतरच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी शूटनंतर माझे अंग दुखू लागले होते. मला वाटले की कदाचित दिवसभर कॉकपीट मध्ये एकाचजागी बसल्याने आणि बेल्ट्स वगैरे लावल्याने अंग दुखत असेल. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याहूनही जास्त अंग दुखू लागले आणि माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी पहिला फोन अजय सरांना केला, ‘सर शूटिंग शेड्युल?’ ते म्हणाले तू आराम कर आणि इथली काळजी करू नकोस. परंतु काळजी होतीच, शूटिंग खोळंबणार आणि त्या दिवशी कॉकपिटमध्ये मी आणि अजय सरच होतो. आणि त्यातच पहिल्या लाटेत कोरोना बरा व्हायला २१ दिवस लागत. मी योगाभ्यास केला, फुगे फुगविले आणि नेट वर जे जे कोरोना संदर्भात सांगितले सांगत होते ते ते केले. परंतु सुदैवाने ११ व्या दिवशी माझी कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली आणि दुसऱ्याच दिवशी मी सेटवर हजर झाले.”
रकुल प्रीत सिंग ला भाषेचा अडसर नाही. ती तेलगू उत्तमपणे बोलू शकते आणि तिला तामिळही समजते. रकुल कुठल्याही भाषेतील चांगल्या भूमिका करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेल. तसेच तिला सर्वच चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे. तिला ऐतिहासिक बायोपिक करण्याची इच्छा आहे. तिच्या आगामी ‘छत्रीवाली’ चित्रपटात ती ‘कंडोम टेस्टर’ च्या प्रमुख भूमिकेत असेल आणि ती ठामपणे सांगते की ती फॅमिली फिल्म आहे. “आम्ही ‘छत्रीवाली’ मधून एक सामाजिक विषय अत्यंत मनोरंजक पद्धतीने मांडणार आहोत”, रकुल प्रीत सिंग ने जाता जाता सांगितले.
हेही वाचा - Ranveer Alia Dance Video : ढोलिडा गाण्याच्या शुटिंगदरम्यान आलियासोबत रणवीर सिंगने केला जबरदस्त डान्स