मुंबई - चित्रपट प्रदर्शनापूर्वी सिनेमाची पोस्टर्स लागतात. ती मोक्याच्या ठिकाणी लागली की चित्रपटाची व्यवस्थित प्रसिद्धी होते. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुचर्चित चित्रपट असून त्याचे पोस्टर आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले. खरंतर मराठी चित्रपटाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. परंतु या चित्रपटाचा आवाका बघता आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर ‘धर्मवीर’ आभाळासम भासत आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नव नवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच शिवाय चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात आता भर पडली आहे एका लक्षवेधी अशा विक्रमाची. अशी गोष्ट जी आजवर मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती.
मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु आता ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे.
झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - Amata Subhash Birthday : राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अमृता सुभाषचा वाढदिवस