मुंबई : सिनेविश्वात जसा मराठी चित्रपटाला मानमरातब मिळतो तसाच मान मराठी कलाकारांनाही मिळतो. आजच्या घडीला अनेक मराठी कलावंत इतर भाषिक चित्रपट, मालिका, वेब सिरीज ई. मधून झळकताना दिसतात. मराठी कलाकारांना रंगभूमीचा बेस असल्यामुळे ते कुठलीही भूमिका सहजतेने करू शकतात. हे आता अनेक अमराठी दिग्दर्शकांच्या ध्यानी आले आहे. अर्थात आता चित्रपटांतील भाषिक रेषा पुसट होऊ लागल्या असून बरेच कलाकार बहुभाषिक कलाकृतींतून प्रेक्षकांसमोर येतात. जसे मराठी कलाकार इतरत्र काम करू लागले आहेत त्याचप्रमाणे इतर भाषिक कलाकारही मराठीत काम करू लागले आहेत. आगामी मराठी सिनेमा ‘फकाट‘ मध्ये अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी बघायला मिळणार असून त्यात तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलेल्या कबीर दुहान सिंगचाही समावेश आहे.
कॉन्फिडेन्शियल धिंगाणा : या चित्रपटात कबीर दुहान सिंग पाकिस्तानी दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठीसाठी अतीव आदर असलेल्या आणि विविध भाषांमध्ये आपली कमाल दाखविलेल्या या उमद्या कलाकाराला मराठी चित्रपटात काम करायचे होते आणि त्याची ही इच्छा 'फकाट'च्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. कबीर दाक्षिणात्य सिनेमातील नावाजलेला चेहरा आहे. बहुभाषिक सिनेमा केल्यामुळे त्याचा अभिनय ताऊन सुलाखून निघालेला आहे. भारदस्त व्यक्तिमत्व आणि प्रभावशाली अभिनय हे त्याचे प्रमुख अस्त्र आहे. आम्हाला एक तगडा व्हिलन हवा होता जो आम्हाला कबीरमध्ये सापडला. महत्वाचे म्हणजे त्याला मराठीबद्दल नितांत आदर आहे आणि त्याला मराठीत काम करण्याची तीव्र इच्छा होती. त्याने अप्रतिम काम केले आहे, असे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हा एक धमाल चित्रपट आहे जो संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करेल. यातील कॉमेडी आणि अॅक्शन सर्वांना आवडेल अशी आहे. थोडक्यात 'फकाट' मध्ये 'कॉन्फिडेन्शियल धिंगाणा' आहे. सगळे उत्तम कलाकार आहेतच आणि त्यांनी भन्नाट काम केलेले आहे. त्यामुळे मी सर्वांना मनोरंजनाची गॅरंटी देतो.
आऊट अँड आऊट कॉमेडी चित्रपट : ‘फकाट‘ हा चित्रपट आऊट अँड आऊट कॉमेडी चित्रपट असून त्यात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव यांसारखे अभिनय-सशक्त कलाकार महत्वपूर्ण भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बहुसंख्य कलाकारांसह एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे. तसेच आजूबाजूला पैसेही दिसत आहेत त्यामुळे हे गौडबंगाल काय आहे याची कल्पना येत नाही. या बुचकळ्यात टाकणाऱ्या पोस्टरमध्ये दमदार कलाकारांची फळी दिसत असून हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे याची कल्पना येते. 'फकाट' या नावाचा अर्थ काय याची कल्पना चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी दिलेली नाही. खाजगी आयुष्यात काही अश्या गोष्टी असतात त्या तुम्हालाच माहिती असतात. काही साध्या असल्या तरी काही प्रक्षोभक देखील असू शकतात. अशीच एखादी कॉन्फिडेन्शिअल प्रक्षोभक गोष्ट विरोधकांच्या हाती लागली तर काय धिंगाणा होईल याची कल्पनाच केलेली बरी, अशाच एका धिंगाण्यावर ‘फकाट' चे कथानक बेतले असून त्यातील रहस्याचा शोध चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच होईल. 'फकाट' वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ यांची प्रस्तुती असून याची निर्मिती निता जाधव यांनी केली आहे.
हेही वाचा : Kl Rahul Birthday : के एल राहुलने पत्नी अथिया शेट्टीसोबत केला वाढदिवस, सुनिल शेट्टीनेही दिल्या शुभेच्छा