मुंबई - दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने सोमवारी बॉक्स ऑफिसवरील महत्त्वपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होत असल्याचे दिसत आहे. मीडियाच्या म्हणण्यानुसार, ब्रम्हास्त्र चित्रपटाने चौथ्या दिवशी 16.25 कोटी रुपये कमावले - हिंदी मार्केटमधून 14.25 कोटी रुपये आणि डब केलेल्या भाषेतील आवृत्त्यांमधून आणखी 2 कोटी रुपये. ब्रह्मास्त्रच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टिंगमध्ये तफावत आढळून येत आहे. दरम्यान, धर्मा प्रॉडक्शन्स, स्त्रोतांचा हवाला न देता दररोज एकूण आकडेवारी शेअर करत आहे. सोमवारी, धर्माने शेअर केले की चित्रपटाने वीकेंडमध्ये 225 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सोमवारी चौथ्या दिवशीची एकूण कमाई १६.२५ कोटी आहे आणि शुक्रवार ते रविवार पहिल्या आठवड्याची २२५ कोटी, अशी मिळून चौथ्या दिवसा अखेर एकूण कमाई २४१.२५ कोटी इतकी आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत ब्रह्मास्त्रने आतापर्यंत भारतात 143 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि परदेशातील बाजारपेठांमधून 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मीडिया अहवालानुसार चार दिवसांत चित्रपटाची जागतिक एकूण कमाई सुमारे 209 कोटी रुपये झाली आहे.
ये जवानी है दिवानी आणि संजू नंतर 150 कोटींचा टप्पा पार करणारा रणबीरचा हा तिसरा चित्रपट ठरणार आहे. रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर निराश झालेल्या रणबीरसाठी ब्रम्हास्त्रने सावरल्याचे सध्या तरी चित्र आहे.
बॉक्स ऑफिस ट्रेंडनुसार चित्रपटाची आयमॅक्स आवृत्ती चांगली चालत आहे. थिएटरमध्ये अर्ध्याहून अधिक खुर्चा भरलेल्या दिसत आहेत. चित्रपटाला दक्षिण भारतातही प्रतिसाद मिळत असून चित्रपटाला व्यवसाय टिकवण्यासाठी शेवटी मल्टिप्लेक्स मार्केटवर अवलंबून राहावे लागेल, असे मानले जात आहे.