मुंबई - आनंद पंडित यांनी नेहमीच आशयपूर्ण चित्रपटांना पाठिंबा दिला आहे. ते प्रामुख्याने हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत कार्यरत असेल तरी त्यांच्या नावे काही चांगले मराठी चित्रपटही आहेत. हल्लीच त्यांचा कब्जा नावाचा चित्रपट प्रदर्शित होऊन गेला आणि आता त्यांचा आगामी मराठी चित्रपट आहे 'बाप माणूस'. अलिकडेच त्यांनी बाप माणूस मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर अनावरीत केले. त्यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे गूजबम्प्स एंटरटेनमेंटने आणि त्यांनीही 'बाप माणूस' या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या मोशन पिक्चर अनावरीत झाल्याची घोषणा केली आहे जो येत्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रत्येकाच्या जीवनात जसे आईचे महत्त्व असते तसेच पित्याचेही असते, कदाचित काकणभर जास्तच. 'बाप माणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर या प्रथितयश दिग्दर्शकाने केले असून त्यातून एक बाप आणि मुलगी यांच्यातील भावनिक नात्याचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. एकल पिता आणि त्याचे पितृत्व यावर तपशिलाने भाष्य करण्यात आले असून त्यातील भावनिक गुंतागुंतीचे दर्शन प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल असा विश्वास दिग्दर्शकाने व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरून असे समजते की एक दृढनिश्चयी बाप आणि त्याची निष्पाप मुलगी यांचे भावनिक नाते अतूट आहे. हा चित्रपट पितृत्वाचे सार सेलिब्रेट करणारा आहे असे निर्माते सांगतात.
बाप माणूस चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी केली असून वैशाल शाह आणि राहुल दुबे सह-निर्माते आहेत. या चित्रपटात पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके आणि शुभांगी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असून बालकलाकार केया इंगळे अभिनय पदार्पण करीत आहे. पुष्कर जोग आणि कीया इंगळे यांच्यातील बाप लेकीचे विशेष बंध या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायास मिळणार आहे. मराठी सिनेमा नेहमीच नवनव्या विषयाबरोबरच कलात्मक सादरी करणासाठीही ओळखला जातो. याच अपेक्षा प्रेक्षक बाप माणूसकडून करतील हे निश्चित. बाप माणूस येत्या ऑगस्ट मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याची तयारी करीत आहे.
हेही वाचा -