मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मंगळवारी त्यांच्या इन्स्टाग्रामवर धर्मेंद्र आपली कविता सादर करत असतानाचा एक सुंदर आणि भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टला अनुपमने हिंदीमध्ये छान कॅप्शन दिलंय. त्यांनी लिहिलंय, 'जेव्हा आपण मोठे होतो, वयाने किंवा स्थितीनुसार, आपण मागे सोडून आलेल्या घराची आठवण येते. ज्या घरात आपण बालपण घालवले होते. त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी थोडा लवकर पोहोचलो. सनी देओलचा मुलगा, करण, त्यामुळे मला धरमजींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. धरमजी त्यांनी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी गुणगुणत होते. या कवितेतील ओळी माझ्या आणि राज बब्बरजींच्या हृदयाला भिडल्या होत्या. माझ्या सांगण्यावरून त्यांनी ही नझम रेकॉर्ड करण्यास सहमती दर्शविली'.
धर्मेंद्र यांनी त्यांचा नातू आणि अभिनेता करण देओलच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पाहुण्यांशी गप्पा मारताना ही कविता सादर केली. हा व्हिडिओ पाहून धर्मेंद्र यांचे तमाम चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकारी प्रतिक्रिया देत आहेत. ही कविता शुट करण्याची परवानगी दिल्याबद्दल अनुपम खेर यांनी धर्मेद्र यांचे आबार मानले आहेत.
आपल्या घराच्या खोलीत एकांतात बसलेले असताना धर्मेंद्र यांना गावाची आठवण येते. मग त्या आठवणींच्या गर्तेत ते गावी जाऊन पोहोचतात. आई त्यांचे स्वागत करते. आईच्या कुशीत शिरावे असे त्यांना वाटते. तिच्या कुशीत त्यांना नीद्रा येऊ लागते. डोळे पाणावतात. आई म्हणते जा बाळ तुझे कितीतरी सवंगडी वाट पाहताहेत त्यांना भेट. मित्रांची तक्रार ऐकताना त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. शाळेकडे जाणारी मुलं पाहून त्यांना परत त्या रस्त्यावरुन जाणारा लहान धर्मेंद्र आठवू लागतो. ते त्याला हाक मारतात आणि त्याला आपल्या जवळ घेतात. आठवणींच्या गर्तेत लोटलेल्या त्या एकांत खोलीत तो एकांतच त्यांचे अश्रू पुसतो, अशा आशयाची ही सुंदर कविता धर्मेंद्र यांच्या प्रतिभेची नवी ओळख करुन देते. धर्मेंद्र यांनी काही महिन्यापूर्वी मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या आईचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आपला चेहरा आईसारखा असल्याचे फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते. धर्मेंद्र यांनी आईच्या आठवणीची कविता सादर केल्यानंतर आम्ही ही खास पोस्ट तुमच्यासाठी इथे शेअर करत आहोत.
दरम्यान, वर्क फ्रंटवर अनुपम खेर हे विवेक अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉर आणि कंगना रणौत यांच्या इमर्जन्सीमध्ये दिसणार आहेत. द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट कोरोना महामारीच्या काळात कोविड-19 लस तयार करण्याच्या शर्यतीत भारताच्या योगदानाभोवती फिरते. दुसरीकडे, धर्मेंद्र दिग्दर्शक करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहेत. हा चित्रपट २८ जुलै २०२३ रोजी रिलीज होणार आहे. त्याशिवाय, त्याच्याकडे शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा आगामी अनटाइटल्ड रोमँटिक चित्रपट देखील आहे.
हेही वाचा -
१. Rrr Director Rajamouli : एसएस राजामौली तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसले
३. Jr Ntr Fan Shyam Dies : ज्युनियर एनटीआर फॅन श्यामचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू