मुंबई - अरुण गवळी या वादग्रस्त व्यक्तिमत्वावर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट बनला होता आणि बराच चाललाही होता. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याचा आता सिक्वेल येऊ घातलाय.
या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. ‘डॅडी’ आणि सूर्याचे नाते प्रेक्षकांनी याआधीच पाहिले आहे. 'डॅडी'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलं आहेच.
मात्र यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय, याचे उत्तर 'दगडी चाळ २' पाहिल्यावरच मिळेल. या चित्रपटात मकरंद देशपांडे 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत.
'दगडी चाळ १' ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.
हेही वाचा - सोनू सूदचा दुबईत वाढदिवस साजरा, सिटी स्कायस्क्रॅपर बिल्डिंगवर झळकला फोटो