मुंबई - गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सख्य झाल्याचे दिसून येते. एके काळी दाक्षिणात्य सिनेमांना प्रादेशिक चित्रपट म्हणून फारसे महत्व दिले जात नव्हते परंतु त्या चित्रपटांतून उत्तमोत्तम कथानकं हाताळली जाऊ लागल्याने बॉलिवूडला त्यांची दखल घ्यावी लागली. अनेक साऊथ इंडियन सिनेमांचे हिंदीत रिमेक होऊ लागले आणि त्यांना यशही मिळू लागले. अचानकपणे दाक्षिणात्य सुपरस्टार्सना पॅन-इंडिया स्टार्स म्हणून मान्यता मिळू लागली कारण अनेक दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत डब करून प्रदर्शित केले गेले ज्यांना खूप यश मिळाले. त्यानंतरची स्टेप होती ती हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दाक्षिणात्य कलाकारांची देवाण घेवाण. आता एक पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित होतोय ज्याचे नाव आहे लायगर. त्यातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. त्याचा तामिळ भाषेतील अर्जुन रेड्डी खूप गाजला होता आणि त्यावरून शाहिद कपूरचा हिंदी कबीर सिंग बनला होता.
आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत विजय देवरकोंडा ने संवाद साधताना म्हटले की, “मी ‘लायगर’ या चित्रपटातर्फे बॉलिवूड मध्ये पदार्पण करतोय. मला अतिशय चांगला वेलकम मिळतोय. इंडस्ट्रीमधून सपोर्ट मिळत असतानाच मला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळतंय. खरंतर मला अचंबा वाटतोय की इतके सगळेजण माझ्यावर इतके प्रेम का करताहेत. याआधी मी कधीही हिंदी चित्रपट केलेला नाहीये तरीसुद्धा मी आणि अनन्या जिथे जिथे जातोय तिथे तिथे हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असतात. मला कळत नाहीये की बॉलिवूडच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाला प्रतिसाद कसा द्यावा. कोणी सांगते की त्यांना माझा इनोसन्स आवडतो तर कोणी सांगतात की त्यांना माझी स्टाईल आवडते. दक्षिणेत माझे भरपूर फॅन्स आहेत परंतु इकडे अनेकांनी माझे चित्रपट डब-व्हर्जन मध्ये पहिले आहेत आणि ते त्यांना प्रचंड आवडले आहेत. हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे आणि सध्या प्रोमोशन्स मध्ये व्यग्र असल्यामुळे त्यावर विचार करायला वेळ नाही परंतु होणारं कौतुक हवेहवेसे वाटणारे आहे. काही महिन्यांनंतर, कदाचित, मला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. परंतु मी इथे नमूद करू इच्छितो की मी बॉलिवूडमध्ये अजूनही जास्त काम करण्यास उत्सुक आहे, अर्थातच इकडच्या प्रेक्षकांनी मला आपलंस केलं तर.”
आपल्या ‘लायगर’ मधील भूमिकेविषयी सांगताना विजय म्हणाला, “मला जेव्हा पुरी सरांनी ही गोष्ट ऐकवली तेव्हा मी ताबडतोब होकार दिला. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण सिनेमा उभा केला. परंतु ही भूमिका कशी साकारायची याचा विचार करू लागलो. काय करायचं याची कल्पना आली होती परंतु कसं करायचं हे माहित नव्हतं. या चित्रपटात ॲक्शन खूप आहे त्यामुळे मला शारीरिक दृष्ट्या तयार व्हावं लागलं. दीडेक वर्ष वेट ट्रेनिंग, फाईट ट्रेनिंग, फिझिकल ट्रेनिंग केलं. पंधरवड्यासाठी थायलंड मध्ये जाऊन ॲक्शनचे ट्रेनिंग घेतलं. आमचा ॲक्शन डायरेक्टर थायलंडचा होता त्यामुळे मी तेथे कठीण असा ‘बूट कॅम्प’ केला. त्यात चित्रपटात माझे कॅरॅक्टर ‘स्टॅमर’ करते त्यामुळे त्या तोतरेपणामुळे माझ्या इमोशन्समध्ये खंड पडू नये याची काळजी घेतली. या चित्रपटात मी माझ्या व्यक्तिमत्वाच्या पूर्णतः विरुद्ध भूमिका साकारतोय आणि ते सोप्पे नक्कीच नव्हते. परंतु लायगर मधील भूमिका साकारताना, मला माझ्या ‘कम्फर्ट झोन’ च्या बाहेर जाऊन काम करावे लागल्यामुळे, समाधान मिळाले.”
विजय देवरकोंडा आध्यात्मिक आहे. त्यावर भाष्य करताना तो म्हणाला, “मी खूप स्पिरिच्युअल आहे. मी एका आश्रमात शिक्षण घेतलं. सकाळी ५ वाजता आमचा दिवस सुरु व्हायचा आणि नंतर भजनाचा कार्यक्रम असायचा. हा आध्यात्मिक ओढा माझ्याकडे माझ्या आई कडून आला आहे. ती पापभिरू आहे. आता हेच बघाना, तिने मला हातात एक गंडा बांधायला दिला होता. तो मी काढून टाकला होता. तिचा मला रात्री फोन आला की तो धागा का काढला. माझा प्रोमोशन करतानाच व्हिडीओ तिने बघितला होता आणि तिने मला दम देऊन तो पुन्हा बांधायला लावला.” (हे सांगत असताना विजयने मनगटावर बांधलेला तो गंडा दाखविला). इथे मला सांगावेसे वाटते की प्रोमोशन वेळी मॉल मधील गर्दी पाहून ती खूप रडली. तिच्याकडूनच मी शिकलोय की पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत. माझ्या यशात तिचा आशीर्वाद आणि तरुणाईचे प्रेम सामील आहे. कॉलेज तरुण तरुणींनी अर्जुन रेड्डी सुपरहिट केला असे मला वाटते. तसेच माझ्या जडणघडणीत माझ्या आजीच्या (नानी ) शिकवणीचा माझ्यावर पगडा आहे.”
‘लायगर’ बद्दल सांगताना विजय पुढे म्हणाला की, “मला त्रुटीपूर्ण कॅरेक्टर्स करायला आवडतात. माझ्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही दोष असतो. अशा भूमिकांतील भेद्यता किंवा अरक्षितता मला आकर्षित करते. अँटी हिरो साकारायला कठीण असतात आणि ते चॅलेंज स्वीकारायला मला आवडते.” विजय ने इंडियन आयडॉलमधील १७ वर्षीय षण्मुखप्रियाला ‘लायगर’ मध्ये पार्श्वगायनाची संधी दिलीय त्याबद्दल सांगताना तो म्हणाला, “षण्मुखप्रिया नेहमी माझा आवडता कलाकार विजय देवरकोंडा आहे असे सांगायची असे मला कळविण्यात आले होते. त्या शोच्या फायनल मध्ये मला तिच्यासाठी एक व्हिडीओ संदेश देण्याची विनंती करण्यात आली होती. माझ्या या टॅलेंटेड फॅन साठी काहीतरी करावे असे वाटले. त्यामुळे नुसता संदेश न देता मी तिला माझ्या चित्रपटासाठी गाणं गाशील का असे विचारले. अर्थात त्याआधी मी तिचे परफॉर्मन्सेस बघितले आणि आमच्या निर्मात्यांना ही दाखविले. त्यांनीही होकार दिला आणि आम्ही तिला ‘लायगर’ साठी पार्श्वगायनाची संधी दिली.”
चित्रपटाच्या यशाच्या अपेक्षेबद्दल विचारले असता विजय देवरकोंडा म्हणाला की, “ब्लॉकबस्टर. मी आणि माझ्या संपूर्ण टीमने या चित्रपटासाठी १४० दिवस अथक मेहनत घेतलीय आणि एक उत्तम प्रॉडक्ट बनविले आहे. मी जवळपास पाच ते सहा वेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रत्येक वेळेस एन्जॉय केलाय. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे. माझ्यावर रिलीज चे प्रेशर अजिबात नाहीये.”
हेही वाचा - माईक टायसनने लायगरच्या शुटिंगसाठी त्याच्या अंगणात दिली होती परवानगी