मुंबई - Amitabh Bachchan thanks fans : दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांसाठी दैवी अस्तित्वापेक्षा कमी नाहीत. त्यांचा 11 ऑक्टोबर रोजी 81 वा वाढदिवस अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त, चाहते त्यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याच्या गेटवर मोठ्या संख्येनं जमले होते. बिग बी यांनी त्यांना अभिवादन केलं आणि त्यांच्यासाठी एक सुंदर पोस्ट शेअर केलीय.
इंस्टाग्रामवर मेगास्टार अमिताभ यांनी एक कोलाज शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे प्रेम आणि कौतुक केल्याबद्दल आभार मानलं. आपल्या चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कायम कृतज्ञ असल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रेमाची परतफेड करण्याचा हा प्रयत्न नसल्याचंही त्यांनी लिहिलंय. कोलाजसोबतच अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हे प्रेम आणि आपुलकी परतफेड करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांच्या पलीकडचं आहे.. मी धन्य आणि नेहमीसाठी कृतज्ञ आहे.'
कोलाजमध्ये त्यांचे चाहते त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने रांगेत उभं असलेलं दिसतात. त्यांच्या हातात एक लांबलचक बॅनर आहे, ज्यावर लिहिलंय, 'श्री. अमिताभ बच्चन सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.' फोटोत अमितभ बच्चन पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत. इथं उपस्थित अनेक लोक त्यांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस चाहत्यांनी जितका जोरदारपणे साजरा केला तसाच तो त्यांच्या कुटुंबीयांनीही साजरा केला. 10 तारखेच्या मध्यरात्री बच्चन यांच्या वाढदिवसाचं केक कापून सेलेब्रिशन झालं. यावेळी जया बच्चन, श्वेता, नव्या नवेली, ऐश्वर्या राय, अगस्त्य नंदा आणि छोटी नात आराध्याही हजर होती.
कामाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन आगामी 'गणपथ' या डिस्टोपियन एक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहेत. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी 'गणपथ' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अमिताभ यांच्याकडे 'कल्की 2898 एडी' हा द्विभाषिक सायन्स फिक्शनची कथा असलेला एक्शन चित्रपट देखील आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.
हेही वाचा -