मुंबई - शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील नवीन गाणे 'गाऊ नके कृष्णा' रिलीज करण्यात आले आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत जयेश खरे हे बालगायकाने गायले आहे. शाहीर साबळेंच्या बालपणीची कथा उलगडत असताना चित्रपटात हे गाणे सादर होते. सुंदर ग्रामीण पार्श्वभूमी, नदी, सुंदर डोंगर दऱ्या, शेती, महिलांचे सण यांचे चित्रण गाण्यात दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
व्हायरल व्हिडिओने जयेश खरेला मिळाली गायनाची संधी - हे सुंदर गाणे जयेश खरे या नवोदित गायकाने गायले आहे. काही महिन्यापूर्वी जयेश या शालेय मुलाचा 'चंद्रा' हे गाणे गात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या एका गाण्यामुळे जयेश सर्वदूर प्रसिद्ध झाला. हे गाणे नेमके संगीतकार अजय अतुल यांच्यापर्यंतही पोहोचले. खड्या आवाजात मुरके घेत जयेशने गायलेले चंद्रा हे गाणे त्यांना खूप आवडले. दरम्यान संगीतकार अजय अतुल यांना महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी एक बालगायकाचा आवाज हवा होता. त्यांनी जयेशला मुंबईत बोलावून घेतले. त्यानंतर मिळालेल्या संधीचे जयेशने सोने केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अजय अतुलने शोधला बालगायक - काही दिवसापूर्वी स्वतः अजय अतुल यांनी जयेश खरेसोबत महाराष्ट्र शाहीर चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचे फोटोही नंतर व्हायरल झाले होते. चंद्रा गाण्यानंतर त्याला अजय अतुलने गाण्यासाठी निवडले ही बातमी महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रांसह डिजीटल मीडियावरही झळकली होती. गेल्या अनेक दिवसापासून या गाण्याची प्रतीक्षा सुरू असताना अखेर हे गीत रिलीज झाले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका अंकुश चौधरी साकारत आहे. या संगीतमय चित्रपटातील गाणी लोकप्रिय संगीतकार जोडी अजय अतुल यांनी बनवली आहेत. संजय छाब्रिया आणि बेला शेंडे निर्मित हा चित्रपट २८ एप्रिल रोजी रिलीज करण्यात येणार आहे.