मुंबई : Actor Vivek Oberoi Fraud Case : अभिनेता विवेक ओबेरॉय याची सुमारे 1.55 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विवेक ओबेरॉयनं जुलै महिन्यात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या गुन्हाच्या तपासादरम्यान आता एका आरोपीला अटक केली आहे. संजय शहा असं या आरोपीचं नाव आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण? : अभिनेता विवेक ओबेरॉयची 1.55 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. एंटरटेनमेंट कंपनी आणि एका सिनेमाच्या निर्मितीसाठी ओबेरॉयला आरोपींनी 1.55 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितलं होतं. तसेच हे पैसे गुंतवल्यानंतर यातून आर्थिक फायदा होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. पण या आरोपींनी कोणत्याही सिनेमाची निर्मिती न करता त्या पैशांचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी केला असल्याचा आरोप ओबेरॉयचा आहे.
आरोपीला अटक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 406, 49, 420 आणि 34 अन्वये 19 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवेक ओबेरॉयचे वकील देवेन बाफना यांनी ही तक्रार दाखल केली होती. दरम्यान, 24 फेब्रुवारी 2017 ला विवेक ओबेरॉयनं ऑनग्रेनिक एलएलपी या फॉर्मची स्थापना केली होती. या फॉर्मचे भागीदार विवेक ओबेरॉय आणि प्रियांका ओबेरॉय आहेत. हा फॉर्म प्रामुख्यानं ऑरगॅनिक उत्पादनं तयार करतो. या उत्पादनाची खरेदी व विक्री भारतभर होते. हा व्यवसाय विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका हे करत होते. या क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास तीन वर्ष काम केलं. मात्र, त्यांच्या उत्पादनाला मागणी जास्त येत नव्हती, त्यामुळं त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत जाण्याचा विचार केला होता.
विवेक ओबेरॉयची फसवणूक : त्यानंतर विवेक ओबेरॉयची मैत्री ही संजय शहासोबत झाली. संजय शहाला फिल्म क्षेत्रांमध्ये इव्हेंट ऑर्गनाइज करणं तसेच फिल्म निर्मिती करण्याचा अनुभव होता. संजय आणि विवेकमध्ये चांगली मैत्री असल्यामुळं त्यांनी एकत्रितरित्या फिल्म क्षेत्रांमध्ये इव्हेंट ऑर्गनाईज करणं तसेच चित्रपट निर्मिती करण्याचं ठरवलं. फेब्रुवारी 2020 मध्ये विवेक ओबेरॉय आणि संजयनं फिल्म क्षेत्रात इव्हेंट ऑर्गनाइज करणे आणि फिल्म निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर विवेक ओबेरॉय आणि संजयनं अंधेरी पूर्व येथील हॉटेल तुंगा इंटरनॅशनल या ठिकाणी भेटायचं ठरवलं. या हॉटेलमध्ये त्यांनी व्यापाराबद्दल चर्चा केली.
याप्रकरणी तपास सुरू : फेब्रुवारी 2020 ते एप्रिल 2022 यादरम्यान संजय शहा, नंदिता शहा, राधिका नंदा व इतर लोकांना विवेकला ऑरगॅनिक एलएलपी या फॉर्ममध्ये भागीदार म्हणून समाविष्ट करून घेण्याबाबतचं आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांनी आनंदीता इंटरटेन्मेंट या फॉर्मची स्थापन करून विवेक ओबेरॉयला वैयक्तिक खात्यातून तसेच ओबेरॉय मेगा इंटरटेन्मेंट एलएलपी या फॉर्ममधून रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच विविध ठिकाणी कार्यक्रम करून त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळेल असे देखील विवेक ओबेरॉयला आरोपींकडून दाखवण्यात आलं. यामधून देखील आरोपीनं 60 लाख कमाई करून फसवणूक केली, त्यानंतर देखील आरोपींनी पैसे उकळण्याचे काम सुरुच ठेवले. संजय शहा, नंदिता शहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई होण्याबाबत तक्रार विवेक ओबेरॉयच्या वकिलांनी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
- Tejas teaser out: कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटचा टीझर झाला प्रदर्शित; पहा टीझर...
- Sky Force Teaser Release: अक्षय कुमारनं आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'चा टीझर केला प्रदर्शित; पहा टिझर...
- Pakistan Actress Mahira Khan Wedding : 'रईस' फेम पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा लग्नाच्या बेडीत, व्हायरल झाले फोटो