मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमांची गाथा चित्रपटांतून समोर येताना दिसतेय. शिवकालीन इतिहासातील अनेक अदृश्य पदर उलगडताना दिसताहेत आणि प्रेक्षकांना त्यावेळेच्या अनेक कथा बघायला मिळताहेत. याच कालखंडातील शिवरायांचा एक मावळा, जो ‘वेडात वीर दौडले सात‘ पैकी एक शिलेदार होता, राव जी हा शिवाजी महाराजांच्या जिलेबी पथकातील एक वीर जो आपले रंभाशी होणारे लग्न पुढे ढकलून शत्रूंना अंगावर घेण्यासाठी लढाईत सामील होतो. रावरंभा या चित्रपटात राव आणि रंभा यांच्या प्रणयाबरोबरच मुघलांशी झालेल्या लढायांचा थरार अनुभवायला मिळणार आहे असे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर संपन्न झाला ज्यावेळी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी उपस्थित होती. ढोल ताशांचा गजरात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि ऐतिहासिक पारंपरिक वेशभूषा धारण करून या चित्रपटातील कलाकार त्यांचे आदरतिथ्य करताना दिसत होते.
रावरंभा हा एक मल्टीस्टारकास्ट चित्रपट म्हणायला हरकत नाही. यात ओम भूतकर आणि मोनालिसा बागल राव आणि रंभा च्या जोडीत दिसणार असून त्यांच्यासोबत शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, मयुरेश पेम, अश्विनी बागल, शशिकांत पवार, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाल मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, प्रशांत नलवडे आदि कलाकार महत्वपूर्ण भूमिकांत दिसणार आहेत.
'सर्व कलाकारांच्या व तंत्रज्ञाच्या सहकार्यामुळे रावरंभा हा एक उत्तम सिनेमा बनला आहे', असे निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार व्यक्त झाले. दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या, 'शिवकालीन कालखंडात शूरवीर कणखर मावळे होतेच परंतु त्यांच्या हृदयातही मृदू हृदय होते. तेही संसारात लक्ष घालीत. याच कालखंडातील, याआधी प्रेक्षकांच्या भेटीला न आलेली, प्रेमकथा आम्ही रावरंभा मधून उलगडून दाखवत आहोत. सर्वच कलाकारांनी या सुंदर कलाकृतीचा भाग होता आल्याचा आनंद आहे असे आवर्जून सांगितले. सर्वांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने आम्हाला साथ दिली याबद्दल त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच असेल. एका मोरपंखी प्रेमकहाणीची किनार असलेला ‘रावरंभा’ प्रेक्षकांच्या मनाला भावेल अशी अपेक्षा आहे. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणारा रावजी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही. रंभा चे प्रेम त्याला लढण्यासाठी ऊर्जा देते आणि ती आपल्या भावनांना आवर घालीत राव ला साथ देते हे बघणे हृद्य असेल.'
देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब प्रस्तुत 'रावरंभा' येत्या शुक्रवारी २६ मे ला चित्रपटगृहांत दाखल होत आहे.
हेही वाचा - Karan Johar 51st Birthday : करण जोहर प्रदर्शित करणार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे फर्स्ट लूक पोस्टर