मुंबई - भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरी आपल्या समाजातून जातीपातीचे उच्चाटन होऊ शकलेले नाही. खरंतर माणसं सर्व सारखीच परंतु वर्णभेदामुळे समाज दुभंगला गेला आहे आणि त्यात राजकारणी आगीत तेल ओतताना दिसतात. मनुष्याने निर्माण केलेल्या जातीव्यवस्थेमुळे देशाचा सर्वांगीण विकास होत नाही तसेच सामाजिक एकोपा घडून येत नाही. ज्येष्ठ लेखक आणि नाटककार विजय तेंडुलकर यांनी नेहमीच आपल्या लिखाणातून, नाटकांमधून सामाजिक भाष्य केलेले दिसून येते. त्यांचे अजरामर नाटक 'पाहिजे जातीचे’ मधून भारतातील जातिव्यवस्थेवर खरमरीत भाष्य केलेले दिसून आले आहे.
सत्तरीच्या दशकातील लिहिलेल्या या नाटकाचे कथानक आजही रीलेटेबल असल्यामुळे यावर एक चित्रपट येऊ घातला आहे ज्याचे नावसुद्धा आहे 'पाहिजे जातीचे'. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च प्रसंगी सयाजी शिंदे, विक्रम गजरे, संजना काळे, दिलीप अहिरे हे कलाकार आणि निर्माते डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे, लेखक-दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू, संवादलेखिका उमा कुलकर्णी, संगीत दिग्दर्शक अन्वेषा यांनी हजेरी लावली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण म्हणजे ‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला शिका’. या सूत्राचा आधार घेत विजय तेंडुलकर यांनी ‘पाहिजे जातीचे’ चे कथानक लिहिले होते. या नाटकाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता आणि त्यावर आधारित चित्रपटालाही प्रचंड यश मिळेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. महिपती हा गावातील एक होतकरू तसेच महत्त्वाकांक्षी तरुण असून केवळ जातीमुळे त्याची भरारी अपूर्ण रहात असते ती केवळ समाज त्याचे पाय खाली खेचत असतो म्हणून. परंतु यावर तो कशी मात करतो आणि यशस्वी भरारी घेतो यावर चित्रपटाचे कथानक बेतले आहे.
डॉ. मल्लिकार्जुन एन. गजरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याबद्दल सांगताना ते म्हणाले की, ' 'पाहिजे जातीचे’ हा चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट आहे. आजही जातीपातीच्या विळख्यात अडकून समाज अनेक होतकरू मुलांचे आयुष्य धुळीस मिळविण्यासाठी मदत करतोय. हे कुठेतरी थांबायला हवं. नोकरी अथवा इतर गोष्टींमध्ये फक्त हुशारी आणि गुणांचा आधार घेणे अनिवार्य करावयास हवे तरच सामाजिक प्रगतीला चालना मिळू शकेल.'
'पाहिजे जातीचे’ हा चित्रपट कबड्डी नरेंद्र बाबू यांनी दिग्दर्शित केला असून त्यात विक्रम गजरे, सयाजी शिंदे, संजना काळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा -
१. Shanya Bags Role :बॉलिवूड डेब्यूपूर्वीच शनाया कपूरने पटकवला मोहनलालच्या पॅन इंडिया चित्रपटात रोल