मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी आली आहे. आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'थ्री इडियट' चित्रपटातील अभिनेता अखिल मिश्रा यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी या चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारली होती. ही व्यक्तीरेखा खूप लोकप्रिय ठरली होती. 'उतरन' या गाजलेल्या चित्रपटातही त्यांनी उमेद सिंह बुंदेला ही व्यक्तीरेखा साकारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार अखिल मिश्रा यांचा मृत्य इमारतीवरुन पडून झालाय. बाल्कनीमध्ये फिरत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले. या घटनेच्या वेळी त्यांची अभिनेत्री पत्नी सुझान बर्नेट हैदराबादमध्ये शुटिंग करत होती. पतीच्या निधनाची बातमी समजताच ती तातडीने घरी जाण्यासाठी धावली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाली आणि त्यांनी मिश्रा यांचे पार्थिव ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवलंय. पतीच्या निधनामुळे सुझान बर्नेटला मोठा आघात झाला आहे.
अखिल मिश्रा यांची वर्कफ्रंट - अखिल मिश्रा हे हिंदी टीव्ही आणि चित्रपटातील नामांकित चेहरा होते. त्यांनी अनेक टीव्ही मालिकातून भूमिका केल्या आहेत. त्यांनी भंवर, उतरन, उड़ान, सीआईडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी यासारख्या मालिकातून व अनेक शोजमधून काम केलं आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत. शाहरुख खानचा डॉन, वेलडन अब्बा, हजारों ख्वाहिशें ऐसी आणि थ्री इ़डियट्स यासारख्या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तीरेखा लोकप्रिय ठरल्या होत्या.
अखिल मिश्राचे खासगी आयुष्य - अखिल यांनी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेट हिच्याशी ३ फेब्रुवारी २००९ मध्ये लग्न कलं. पारंपरिक भारतीय पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला होता. अखिल आणि सुझान यांनी क्रम या चित्रपटात आणि मेरा दिल दिवाना या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मजनू की जुलियट या शॉर्ट फिल्ममध्येही दोघांनी एकत्र काम केलं होतं. ही फिल्म स्वतः अखिल मिश्रा यांनीच दिग्दर्शित केली होती.
अखिल मिश्राची पत्नी सुझानबद्दल - सुझान बर्नेटबद्दल बोलायचं तर तिने लोकप्रिय टीव्ही मालिका कसौटी जिंदगी की. सावधान इंडिया, एक हजारों में मेरी बहना, चक्रवर्ती अशोका सम्राट, यह रिश्ता का क्या कहलाता है आणि पोरसमध्ये काम केलं आहे. पतीच्या निधनानं तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.