मुंबई - यशराज फिल्म्सने २०२१ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या मोठ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षभरासाठी तब्बल पाच चित्रपटांची निर्मिती झाली असून हे सर्व चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
"संदीप और पिंकी फरार" हा चित्रपट १९ मार्च रोजी रिलीज केला जाणार आहे. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज होणार होता पण कोविडमुळे रिलीज पुढे ढकलले गेले होते.
‘बंटी और बबली २’ हा २००५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वेल २३ एप्रिल रोजी रिलीज होईल. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यासह सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन दिग्दर्शक वरुण व्ही. शर्मा यांनी केले आहे.
करण मल्होत्रा दिग्दर्शित "शमशेरा" या चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला "जयेशभाई जोरदार" हा चित्रपट २७ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात रणवीरची नायिका म्हणून शालिनी पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज चित्रपट निर्माते दिव्यांग ठक्कर यांनी केले असून यात बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाहही आहेत.
अखेर वायआरएफने दिवाळीच्या दिवशी अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी काही फटाके उडवायचे ठरवले आहे. अक्षयचा हा आगामी ऐतिहासिक चित्रपट "पृथ्वीराज" नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटातून मिस वर्ल्ड २०१७ मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हेही वाचा - रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण