मुंबई - भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे ठाणे आणि इतर ठिकाणचे गुंड ईशान्य मुंबई मतदार संघात आणत आहेत. त्यामुळे भाजप ही निवडणूक गुंडांच्या सहाय्याने लढवत आहे, असा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला.
ईशान्य मुंबई मतदार संघातील आघाडीचे उमेदवार पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मुलुंड येथील निवडणूक कार्यालयात भरला. त्यापूर्वी त्यांनी भाजपचा गड असलेल्या मुलुंडमध्ये शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, भाजप लोकांचे स्वागत गुंडांकडून करत आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांच्या सोबत फिरायला गुंड असतात. आमच्यासोबत कोण दिसतील त्यांना हे गुंड धमक्या देतात, असा आरोप केला.
पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी हे सर्व लोक स्वतःहून आलेले आहेत. तुमच्याप्रमाणे भाड्यावर माणसे आणली नाहीत, असा टोला भाजपला लगावला.
निवडणूक ही लढाई असते. लढाई छोटी किंवा मोठी नसते. ईशान्य मुंबईमधील निवडणुकीत मला कोणाचेही आव्हान दिसत नाही. भाजपने जे खोटे वादे केले आहेत. त्याचा लोकांना अंदाज आला आहे, त्यामुळेच त्यांना हार दिसत आहे. आम्ही गेली काही वर्ष जे काम केले त्याचे फळ आम्हाला मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.