पुणे - मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाल्हेरकरवाडी येथून रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत त्यांचा भाऊ जय, आई सुनेत्रा पवार, वडिल अजित पवार यांच्यासह आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ यांनी पिंपरीतील एच.ए कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मोरवाडी येथे अहल्यादेवी होळकर, निगडीत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. चिंचवड येथे क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली.
आहेर गार्डन वाल्हेकरवाडी ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार अण्णा बनसोडे, बापूसाहेब भेगडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, नगरसेवक मयूर कलाटे, राजू मिसाळ, जय पवार, निहाल पानसरे, वर्षा जगताप, शहरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
प्राप्त अर्जांची छाननी १० एप्रिल रोजी होणार आहे. तर, १२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल आणि प्रचाराला रंगत येईल. मोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होईल.