नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठी या मतदारसंघात एकूण १४ हजार ९१९ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये ४४ हजार ईव्हीएम मशीन आणि २० हजार व्हीव्हीपॅट यंत्र लावण्यात येणार आहेत.
संपूर्ण देशात ७ टप्प्यात तर राज्यात एकूण ४ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. ११ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली-चिमूर सारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. तर इतर मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. विदर्भाच्या ७ लोकसभा मतदारसंघात एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय करणार आहेत. यामध्ये ६६ लाख ७१ हजार पुरुष मतदार तर ६३ लाख ६४ हजार महिला मतदार आहेत. याशिवाय १८१ तृतीय पंथी मतदारदेखील आपल्या मताचा हक्क बजावणार आहेत.