सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला असून मोहिते-पाटलांसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा लढा ठरणार आहे, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गावंच्या-गावं पिंजून काढायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत लढा लोकसभेचा पण, चर्चा मात्र मोहिते-शिंदेंच्या राजकीय शह-काटशहाची सुरु आहे. त्यातूनच परस्परांच्या विरोधात टीकेच्या फैरी झडत आहेत.
राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करत भाजपचा झेंडा हाती घेतलेले रणजितसिंह मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे हे परस्परांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील दिवसरात्र प्रचार सभा घेत आहेत. म्हणून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय हा मोहिते-पाटलांनी राजकीयदृष्ट्या अस्तित्वाचा मुद्दा केला आहे. रात्री त्यांनी टेंभूर्णी परिसरातल्या तीन गावांमधून सभा घेतल्या. त्यातली पहिली सभा अकोले खुर्द येथे पार पडली. या सभेत भाजप नेत्यांनी माढ्याच्या शिंदे बंधूवर जोरदार टीका केली. तर रणजितसिंह यांनी या निवडणुकीत खासदार आणि लोकसभेतले मुद्दे सोडून फक्त मोहिते-पाटील निवडणूक मुद्दा बनवल्याची टीका विरोधकांवर केली. त्याच्या बोलण्याचा रोख शरद पवार यांच्याही दिशेने होता.
माढा लोकसभा मतदारसंघात पाणी, सिंचन, दुष्काळ असे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न गंभीर आहेत. असे असताना सुद्धा निवडणुकीचा प्रचार हा पवार, शिंदे-बंधू विरुद्ध मोहिते-पाटील यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. प्रचाराला फक्त आजचा एक दिवस उरला असतानाही परस्परांच्या विरोधातल्या मुद्यांनाच प्राधान्य देताना दिसत आहेत. आता मतदार कुणाला, कुठल्या मुद्द्यावर साथ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.