कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ मतदारसंघांत मतदान सुरू आहे. येथील घाटल लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार भारती घोष यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोगाचिया या मतदान केंद्रावर ही घटना घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
वाहनांवर हल्ला होताच घोष यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी जमावावर लाठी चार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना घोष यांच्या आगमानाने गोंधळ सुरू झाला.
भाजप उमेदवार भारती घोष या माजी आपीएस अधिकारी आहेत. त्या घाटाल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केशपूर मतदान केंद्रावर त्यांना तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी आज सकाळी धक्का बुक्की केल्याचे समोर आले होते. त्या पोलिंग एजंटसोबत मतदान केंद्रामध्ये जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.