नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या जाहीरातीसाठी राजकीय पक्ष गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. गुगलवरुन जाहीरात करण्यासाठी भाजपने सर्वात जास्त पैसे मोजले आहेत, असे गुगलने आपल्या अहवालात प्रसिद्ध केले आहे. तर, दक्षिण भारतातील काही पक्षांनीही गुगल माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे पक्ष गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामध्ये भाजप अग्रक्रमांकार आहे. यावर प्रचारासाठी भाजपने तब्बल १ कोटी २१ लाख ४८ हजार ६०० रुपये खर्च केले आहेत. यामध्ये मैं भी चौकीदार या मोहिमेवर त्यांनी सर्वात जास्त खर्च केल्याचे गुगल सांगत आहे.
गुगल माध्यमाचा प्रचारासाठी वापर करणाऱ्यांमध्ये देशातील ११ पक्ष आघाडीवर आहेत. त्यामध्ये काँग्रेस सहाव्या स्थानावर आहे. काँग्रेसने आत्तापर्यंत ५४ हजार १०० रुपये खर्च केले आहे. तर, गुगलवर खर्च करणाऱ्यांमध्ये आंध्राप्रदेशचा वायएसआर काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. वायएसआर पक्षाने १ कोटी ४ लाख ३४ हजार ५०० रुपये खर्च केले आहे. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी जुळलेल्या परमान्य स्ट्रॅटेजी कन्सल्टिंग प्राईवेट कंपनने खर्च केला आहे.
देशामध्ये ४जी आल्यापासून नेटचे दर कमी झाले आहे. त्यामुळे जनतेजवळ नेट सहज उपलब्ध झालेला आहे. राजकीय पक्षांनी हेच हेरलेले दिसते. त्यासाठी यूट्यूब आणि इतर वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहीराती खरेदी करण्याचे प्रचलन राजकीय पक्षांमध्ये वाढले आहे. त्यासाठी ते बक्कळ पैसाही मोजत आहेत.