नांदेड : नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणातील 9 आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी (ता. 13) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी या 9 आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत सात दिवस 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास बिलोली पोलीस उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर : बांधकाम व्यावसायिक बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर, दुचाकीवरील दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी विविध राज्यांतून 11 आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. सुरुवातीला अटक केलेले 9 आरोपी 13 जूनपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने 9 आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने मोक्काअंतर्गत पोलीस कोठडी वाढवली : यावेळी या प्रकरणात मोक्का कायदा वाढविल्याचे निवेदन न्यायालयात सादर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. आशिष गोदमगावकर यांनी या प्रकरणात संजय बियाणी यांना गोळी मारणाऱ्या आरोपींना पकडणे बाकी आहे. तसेच, इतर अनेक बाबींचा तपास करणे आहे. यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. तसेच, आरोपींच्या वतीने सहा वकिलांनी हे प्रकरण मोक्काचे नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता नऊ आरोपींना सात दिवस 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
हेही वाचा : Sanjay Biyani Murder Case : संजय बियाणी हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी केली जप्त