ठाणे - अंबरनाथमध्ये नशेच्या गोळ्यांचं अतिसेवन (Drug Overdose) केल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आमिर मेहबूब शेख उर्फ लाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात आमिर मेहबूब शेख उर्फ लाला हा कुटूंबासह राहत होता. मृत आमिरला गेल्या काही दिवसांपासून नशेचे व्यसन लागलं होते. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्याने नशेच्या गोळ्यांचं अतिसेवन केल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला एका रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र, तीन दिवस उपचार सुरु असताना मंगळवारी संध्याकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्याने त्याच निधन झाले. तरुण मुलाच्या अशा अकाली निधनानं त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी मृत आमिरच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नशेच्या पदार्थांची विक्री होत असेल, तर कारवाई करु - या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांशी संपर्क साधलाअसता, पोलीस ठाण्यात अद्याप अशी नोंद नसून डॉक्टरांनी आमिरचा मृत्यू हा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच अवयव निकामी झाल्यामुळे झाल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या पदार्थांची विक्री होत असेल, तर त्यावर कारवाई करु, असे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितलं आहे.
काय आहेत नशेच्या गोळ्या?- अंबरनाथमधील डॉक्टर झुबेर शाह यांच्या म्हणण्यानुसार, नशेच्या ळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या असतात. मात्र, या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जाऊ शकत नाहीत. हे शेड्यूल्ड ड्रग असल्यानं त्याची विक्री किंवा साठा करण्यावरही निर्बंध आहेत. अशी माहिती डॉ. झुबेर शाह यांनी दिली. नशा आणणारे गोळ्या कुठल्याही औषध विक्रीच्या दुकानात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे रस्त्यावर, प्लॅटफॉर्मवर फिरणारी मुले आपल्याला रुमाल तोंडाला लावून सतत काहीतरी हुंगताना दिसतात. मात्र, यामुळं काही कालावधीनंतर शरीराची मोठी हानी होते आणि मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळं येणाऱ्या पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवायचं असेल, तर यावर पोलीस प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई गरजेचे असल्याच्या मागणी मृत अमीरच्या नातेवाईकांनी केली आहे.