ठाणे - कोरोना अथवा इतर आजारावर उपचार करून घेण्यासाठी काही नागरिकांची आर्थिक कुवत नसते. मुंबईमधील वरळी, माहीम या भागातील अशा नागरिकांसाठी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून 'वन रुपी क्लिनिक' योजना राबवण्यात आली होती. या माध्यमातून सर्वसामान्य गोर-गरीबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देत तेथील कोरोना आटोक्यात आणण्यात यश आले होते.
याच धर्तीवर आता येत्या पंधरा दिवसात भिवंडी शहरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या विविध भागात महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अहतेसाब सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा... विठ्ठल सगळं करणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे - विनायक मेटे
या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित या पत्रकार परिषदेस वन रुपी क्लिनिकचे डॉ.राहुल घुले, महानगर पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे आदी मान्यवर उपस्थित होते. भिवंडी शहरातील कोरोनाबाधितांची आणि मृत्यु होणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक झाली आहे. त्यातच असंख्य नागरिकांना वेळेत उपचार न मिळाल्याने शिवाय लक्षणांची वेळीच माहित न होण्याने इतर नागरिक बाधित होत आहे. त्यामुळे भिवंडीत वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसात किमान एक लाख नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी आणि मोफत औषधोपचार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली.
आमदार रईस शेख यांनी या प्रकल्पाविषयी बोलताना सांगितले की, भिवंडी या यंत्रमाग शहरात असंख्य कामगार वास्तव्यास असून मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या नव्या उपक्रमास भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांनी सुध्दा स्वतःहून पुढे येऊन आपल्याला होणाऱ्या व्याधींची, कोरोना लक्षणांची माहिती लपवून न ठेवता उपचार करून घेतल्यास कोरोनावर आपण नक्कीच विजय मिळवू असा विश्वास व्यक्त केला.