ठाणे - इंधन दरवाढीवरून मोदी सरकार विरोधात महिला काँग्रेसच्या वतीने 'पुंगी बजाओ' आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडर, डिझेल, पेट्रोल आणि खाद्य तेल व इतर वस्तूंचे भाव दिवसा गणिक वाढत असल्याचे सांगत, आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाणे शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. शिवाय आंदोलनावेळी महिलांनी गॅस सिलेंडर घेत, विविध पोस्टरच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त केला.
'...तर केंद्र सरकारला शेणाच्या गोवऱ्या देऊ'
कोरोना काळाच्या सुरूवातीपासून महागाईत वाढ झाली आहे. तेल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तू प्रचंड महागल्या आहेत. परंतु ही महागाई रोखण्यासाठी प्रयत्न करताना केंद्र सरकार दिसत नाही. आता ही महागाई रोखली नाही, तर देशभरातील सर्व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शिल्पा सोनोणे यांनी दिला. सोबतच गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे शेणाच्या गोवऱ्या मोदी सरकारला भेट वस्तू म्हणून देणार असल्याचेही शिल्पा सोनोणे यांनी सांगितले.