ठाणे - असल्या हल्ल्यांना आपण भीक घालत नाही व ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे म्हणाल्या. पिंपळे यांच्यावर काल एका फेरीवाल्याने हल्ला केला होता. त्यात त्या जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आपण महापालिकेचे जबाबदार अधिकारी असून असल्या भ्याड हल्ल्यांना भीक घालत नसून बरे होऊन पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू होणार व पाहिल्यासारखीच कडक कारवाई करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - बाळासाहेबांचा पक्ष सत्तेत असताना आम्हाला आमच्या सणांसाठी भांडावे लागत आहे - मनसे नेते अविनाश जाधव
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या या प्रतिक्रियेतून एका स्त्रीचा निर्धार किती पक्का असतो आणि त्यांचे मन किती कणखर असते, याची प्रचिती आज आली. कालच एका माथेफिरू फेरीवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात त्यांनी आपली दोन बोटे गमावली होती. आपण या हल्ल्याने अजिबात डगमगलो नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
काय झाले होते?
मानपाडा - माजिवडा प्रभाग समिती क्षेत्रातील कासारवडवली बाजारात काल एका अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करत असताना फेरीवाल्याने धारदार सुरीने अचानक हल्ला चढवला. त्याचा हल्ला एवढा प्राणघातक होता की त्यात कल्पिता पिंपळे यांना आपल्या डाव्या हाताची दोन, तर त्यांच्या अंगरक्षकाला एक बोट गमवावा लागला होता.
अमर्जीत यादव या माथेफिरूचा घाव हातावर झेलला नसता तर कदाचित त्यांना आपला जीव देखील गमवावा लागला असता. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिथूनच त्यांनी आपला निग्रह बोलून दाखवला. असल्या हल्ल्यांना आपण भीक घालत नाही व ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण महापालिकेचे जबाबदार अधिकारी असून असल्या भ्याड हल्ल्यांना भीक घालत नसून बरे होऊन येताच पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू होऊन पाहिल्या सारखीच कडक कारवाई करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बोटांवर झाली शस्त्रक्रिया
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कल्पिता यांच्या दोन्ही बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून लवकरच त्या बरे होऊन कामावर पुन्हा रुजू होतील, असा आत्मविश्वास त्यांना आहे. आता पुन्हा कामावर आल्यावर आपली कारवाई ही सुरूच ठेवणार असल्याचे सांगून त्यांनी त्यांचा आत्मविश्वास दाखवून दिला आहे.
हेही वाचा - हरे रामा हरे कृष्णा ... इस्कॉन खारघर येथे जन्माष्टमी सोहळा साजरा