भिवंडी: भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडकाम सुरू असतानाच, भिंत शेजाऱ्याच्या घरावर कोसळल्याने 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत रस्त्यावर खेळत असलेल्या तीन चिमुरड्या मुलांसह दोन वृद्ध व एक तरुणी असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. अलीशा वय ३ वर्ष मुलगी, नाझिया शेख वय १७ वर्ष मुलगी, निजामुद्दीन अन्सारी वय ६० वर्ष, फैजान वय ८ वर्ष मुलगा, जैनाब अजहर खान वय ४ वर्ष मुलगी व एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला असे या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सहा जणांची नावे असून या जखमींना सुरुवातीला शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, गंभीर दुखापत असल्याने त्यांना ठाणे कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून सध्या या सहाही जणांवर भिवंडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात गरीब नवाज हॉल हे खुल्या मैदानातील मंगल कार्यालय होते. या मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत धोकादायक झाल्याने मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदाराकडून धोकादायक भिंत पाडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरु केले होते. यावेळी भिंती पलीकडे असलेल्या रहिवासी गल्लीतील रस्त्यावर कोसळली.
या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी जेसीबीची तोडफोड केली. मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध केला असून मनपा प्रशासनाने हि कारवाई करतांना परिसरातील नागरिकांना कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. तर या जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मनपा प्रशासनाने उचलून या जखमींना आर्थिक साहाय्य करून बेजबाबदारपणे तोडक कारवाई करणाऱ्या मनपा अधिकारी कर्मचारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.