अमरावती - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पदाची निवडणूक करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे विभाग प्रमुख तथा मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विजयकुमार चौबे यांची महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी निवड केली आहे. ( Vijay Choubey appointed pro vice chancellor of Amravati )
विद्यमान कुलगुरूंइतका राहणार कार्यकाळ - डॉ. चौबे हे प्र-कुलगुरू पदी रुजू झाले आहेत. 9 मे रोजी त्यांची राजभवन येथे मुलाखत झाली होती. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे विभाग प्रमुख तसेच मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. चौबे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ विद्यमान कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या बरोबरीने असणार आहे.
अनेकांनी केले अभिनंदन - डॉ. विजय कुमार चौबे यांची प्र-कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कुलगुरू कार्यालयांमध्ये अभिनंदन केले. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉ. चौबे यांचे अभिनंदन केले आहे.