ठाणे - नागरिकांच्या सुविधेसाठी भाजीपाला, अन्नधान्य, दूध, फळे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तुंना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. परंतु भाजीपाला घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने मात्र प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पोलीस आणि पालिका प्रशासनाने ठाणे जांभळी नाका येथील घाऊक व्यापाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. बैठकीदरम्यान नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जांभळी नाका येथील बाजार तात्पुरता सेंट्रल मैदान येथे हलविण्याचा प्रस्ताव देण्यात आला.
सर्व व्यापाऱ्यांनी या प्रस्तावाचे स्वागत करुन स्थलांतरित होण्यास आपली संमती दर्शविली. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी या मोठ्या जागेत हा बाजार हलविण्यात येणार असून त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर राखले जाईल असे मत उपायुक्त मनीष जोशी यांनी व्यक्त केले. मुंब्र्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी तेथे देखील अभ्यासक गेले आहेत. लवकरच सर्वमान्य असा तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त बुरसे यांनी दिले. बाजार स्थलांतरित केल्या जाणाऱ्या सेंट्रल मैदानातील स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष रमाकांत मढवी यांनी खेळपट्ट्या खराब न करण्याच्या अटीवर आपण हे मैदान वापरासाठी देत असल्याची माहिती दिली. या बैठकीत कोपरी नौपाड्याचे सहआयुक्त मारुती गायकवाड, पालिका उपायुक्त मनीष जोशी, पोलीस उपायुक्त बुरसे, ठाणेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी, नगरसेवक नजीब मुल्ला आदींसह अनेक घाऊक व्यापारी उपस्थित होते.