ठाणे - शहापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातांकडून रस्त्यावर विषारी रसायन ओतण्याचे सत्र सुरू आहे. या विषारी रसायनाच्या उग्र वासामुळे गावकरी त्रस्त झाले असून शहापूरकरांची या त्रासापासून सुटका कधी होईल, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
हेही वाचा... बांग्लादेशात अल्पसंख्य सुरक्षितच, परराष्ट्र मंत्री मोमेन यांनी भारताचा दावा फेटाळला
तालुक्यातील सापगाव, शेलवली पाठोपाठ आता मलेगाव परिसरात अज्ञातांनी रसायन ओतल्याचे आढळून आले. त्यामुळे मलेगाव परिसरातील गावकऱ्यांना उग्र वासामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अद्यापपर्यंत टँकरने रसायन ओतणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तींचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांपुढे एक आव्हान उभे ठाकले आहे.
हेही वाचा... B'Day Special : बारामतीकारांनी अनुभवलेले शरद पवार...
विशेष म्हणजे या रसायनाच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. अशातच मलेगाव गावातील तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन रसायन सोडलेल्या जागेवर डंपरच्या सहाय्याने माती टाकली. त्यामुळे विषारी रसायनाच्या उग्र वासापासून गावकऱ्यांची तात्पुरती सुटका झाली आहे. तरीही यापुढे असा कोणताही प्रकार होऊ नये, असे या तरुणांचे म्हणणे आहे. याप्रकरणी स्थानिक गावकऱ्यांनी किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पालवे यांच्याकडे रसायन ओतणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.