ठाणे - कार चोरीच्या हेतूने उबेर कार चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह घाटात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी उबेर चालकाच्या हत्येचा उलगडा ९ दिवसांनी करून या गुन्ह्यातील २ आरोपींना मोबाईल लोकेशनच्या आधारे ताब्यात घेतले आहे.
अमृत सिध्दराम गावडे (वय ३५, रा. दिघा-ऐरोली, नवी मुंबई) असे हत्या झालेल्या उबेर कार चालकाचं नाव आहे. तर राहुलकुमार बाबुराव गौतम (वय २४, वर्ष रा. ग्राम कौडर, भदोही, उत्तरप्रदेश), धर्मेंद्रकुमार उर्फ वकील संपतराम गौतम (वय २७ वर्ष) विशालकुमार नाहर गौतम, करणकुमार विनोद गौतम, बचई गौतम आणि अमन हरीश्चंद्र गौतम असे आरोपींची नावे असून हे सर्व उत्तरप्रदेश राज्यातील भदोही जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. या पैकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार असून पोलीस पथक त्यांच्या मागावर उत्तरप्रदेश राज्यात पोहचले आहे.
कल्याणातून केली कार बुक
आरोपी राहुलकुमार बाबुराव गौतम, धर्मेंद्रकुमार उर्फ वकील संपतराम गौतम, विशालकुमार नाहर गौतम, करणकुमार विनोद गौतम, बचई गौतम आणि अमन हरीश्चंद्र गौतम या पाच जणांनी आपसात संगणमत करून कार चोरण्याचा प्लॅन केला. त्यानुसार आरोपी अमन गौतम याच्या सूचनेवरून अन्य जणांनी कार चोरी करण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट रोजी रात्रौ साडेअकरा कल्याण ते धुळे असा प्रवास करण्याकरिता मृत चालक अमृतची कार एमएच 43/बीपी 9946 क्रमांकाची इर्टिगा कार कल्याणात कार बुक केली. कार धुळे येथे जाणार असल्याने मृतकने कार मालकाला कल्याण ते धुळे दरम्यान टोल नाक्याचे ऑनलाईन रक्कम भरण्यास व फास्ट टेग वापरून कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात १ ऑगष्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भाडे घेऊन निघाला. पाचही आरोपी कारमधून मुंबई - आग्रा रोडने प्रवास करत असताना त्यांनी मध्येच कार चालकाचे अपहरण केले. पडघा ते कसारा दरम्यान त्यांच्याकडील धारदार हत्याराने त्यातच दिवशी मध्यरात्री कार चालक अमृतची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला. त्यानंतर पाचही आरोपी कारसह पसार झाले.
...आणि हत्येचा घटनाक्रम ९ दिवसांनी आला समोर
२ ऑगस्ट रोजी कार मालकाने मृतक चालक अमृतला मोबाईलवर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. मोबाईल बंद आढळून आला. त्यामुळे ज्या ठिकाणावरून आरोपींनी कार बुक केली होती. ते कल्याण पश्चिम भागातील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने कार मालकाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून ज्या मोबाईल नंबरच्या आधारे कार बुक करण्यात आली होती. त्या मोबाईलचा तपास करून त्यावर संर्पक साधला मात्र तोही मोबाईल बंद होता. त्यामुळे मोबाईल बंद करण्याआदी कोणा कोणाशी संपर्क झाला. याचा शोध पोलिसांनी घेतला असता, दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. आणि कार चालकाच्या हत्येचा घटनाक्रम ९ दिवसांनी समोर आला.
कसारा घाटातील दरीतून अंत्यत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह काढला बाहेर
ताब्यात असलेल्या आरोपींनी पोलीस पथकाला हत्येच्या घटनाक्रमची माहिती देत, ज्या ठिकाणी कसारा घाटात मृतदेह फेकला होता. ते ठिकाणीही दाखवताच पोलिसांनी कसारा घाटात घटनस्थळी धाव घेऊन कसारा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांच्या मदतीने कसारा घाटातील दरीतून अंत्यत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. शिवाय घटनेच्या दिवसाचे कल्याण ते कसारा दरम्यान महामार्गावरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेऊन त्या फुटेज आधारे व मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पत्रे यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पोलीस नाईक प्रदीप पाटील अधिक तपास करत आहेत.