ठाणे - उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असताना, पुन्हा एकदा भर वस्तीत तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण करीत मोबाईल व रोख रक्कम जबरीने घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती. मात्र, मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या दोन तासातच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. शंकर साळुंके (वय 19) आणि बाबू शर्मा (वय 22) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत तर त्यांचा एक साथीदार फरार असून मध्यवर्ती पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन येथील, सेक्शन 19 परिसरात राहणारा राज बहादुर यादव (वय 19), हा रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घनश्याम मेडिकल स्टोअरच्या मागील गल्लीतून स्थानकाकडे पायी जात होता. त्यावेळी तिघांनी राजबहादुरला अडवले आणि त्याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल व सहा हजार रुपये रोख रक्कम जबरीने घेऊन पसार झाले.
मध्यवर्ती पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर यांच्या पथकाने अवघ्या दोन तासात सीसीटीव्ही फुटेजद्वारे या आरोपींना हिरा घाट परिसरातून ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल फोन आणि एक हजाराची रोकड, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकर करीत आहेत.