ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे मृतक भाऊ भिवंडी शहरातील विठ्ठलनगर भागात असलेल्या एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होते. ते त्यांच्या नातेवाईकांसोबत भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील वारणा नदी पात्रात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोहण्यासाठी गेले. मात्र नातेवाईकांसोबत नदी पात्रात पोहत असताना इमरानला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्यामुळे सुफियान त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र दोघेही खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाले.
दोघे भाऊ बुडत असल्याचे पाहून नातेवाईकांनी आरडाओरड केली असता स्थानिक ग्रामस्थांनी दोघांना पाण्याबाहेर काढून तोंडावाटे शरीरात पाणी गेल्याने दोघांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेने मन्सूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.