ठाणे : होळीचे दहन होताच बच्चे कंपनीपासून ते वयोवृद्धांमध्ये धुळवडचा उत्सव सुरु होऊन विविध रंगाची उधळण केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षात रासायनिक रंगाने धुळवड खेळल्याने त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम होत आहेतय होळीसाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची निर्मिती करण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील आदिवासी पाड्यातील महिला वनौषधी, आजूबाजूला असलेल्या फुलांनी नैसर्गिक होळीचा रंग तयार करण्यासाठी पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे रासायनिक रंगांने आरोग्यावर हानिकारक परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करून सावध होळी खेळण्याचा संदेश आदिवासी महिलांनी दिला आहे. दुसरीकडे नैसर्गिक रंगांच्या निर्मितीतून आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे.
वन औषध व इतर साहित्यापासून नैसर्गिक रंग.. मुरबाडच्या कृषी विज्ञान विभागाच्या वतीने मुरबाडच्या ग्रामीण भागात होळीसाठी नैसर्गिक रंग बनवण्याचे आदिवासी महिलांना प्रशिक्षण दिले. याचे आयोजन महिलादिनापासून करण्यात आले. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विशेष तज्ञ अस्मिता तुपे यांनी होळीच्या नैसर्गिक रंगाचे महत्त्व आणि उपलब्ध विविध स्त्रोतांची माहिती दिली. या प्रशिक्षणात विविध नैसर्गिक साहित्यापासून पर्यावरणपूरक असे रंग तयार करण्यास प्रशिक्षण देण्यात आले. निसर्गात उपलब्ध वन औषध व इतर साहित्यापासून जसे की, पळस फुल, बीट रूट, हळद, कडुलिंबाचा पाला, निलगिरीची साल इत्यादी साहित्यापासून नैसर्गिक रंग निर्मिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली.
२० हून अधिक आदिवासी पाड्यांमध्ये कार्यशाळा..
या कार्यशाळांचे आयोजन करणाऱ्या कृषी विज्ञान आणि गृहविज्ञान तज्ज्ञ अस्मिता तुपे म्हणाल्या, "आम्ही मुरबाड आणि सरळगाव परिसरातील २० हून अधिक आदिवासी पाड्यांमध्ये नैसर्गिक रंग बनवण्याच्या कार्यशाळा घेऊन महिलांना प्रशिक्षण दिले. नैसर्गिक रंग कसे वितरित करायचे याबद्दल काही महिलांनी विचारले होते. त्यामुळे आम्ही त्यात विविध रंग पॅकेजिंग कसे केले जातात याचीही विस्तारित कार्यशाळा घेतली असून नैसर्गिक रंगासाठी पळसाचे झाड, गुलाब, कडुलिंबाची पाने, हळद, निलगिरी, विविध वनऔषधी उपलब्ध करून त्यामध्ये पीठ, निरोगी माती आणि इतर काही साहित्य वापरून कोरडे आणि ओले दोन्ही प्रकारचे रंग तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. रंगाची किंमत किमान ५ रुपये .. सरळगावातील शांती पवार हिने सांगितले की, "आमच्या गावातील आदिवासी पाड्यांतील महिलांनी एकत्र येऊन कार्यशाळेत सहभाग घेतला. घराच्या आजूबाजूच्या परिसरात सहज नैसर्गिक रंगांसाठी सर्व साहित्य मिळते. त्या साहित्याचा वापर करून नैसर्गिक रंग तयार केले जात आहे. आता हे रंग मुलांना धुळवड उत्सवासाठी वापरण्यास प्रोत्साहित केले जात असून ही केवळ एक सुरुवात आहे. गेल्या दोन दिवसापासून तयार केलेले नैसर्गिक रंग घरोघरी विकले जात आहेत. तर रंग आणि पॅकेजिंग करण्यासाठी आम्ही महिलांचे वेगवेगळे गट तयार केले आहेत. याची किंमत आम्ही 5 रुपये ठरवू.
नाविन्यपूर्ण संधींविषयी मार्गदर्शन
ग्रामीण भागातील आदिवासी महिला बचत गटांसाठी “कृषी संलग्न क्षेत्रातील उद्योजकता विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पना” या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात मानवली, ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. पुष्पा मदन दळवी, ग्रामसंघ, अध्यक्ष सौ. राजूला महेश बांगरसह मोठ्या संख्याने महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा - विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी; विदर्भाचा विश्वासघात केल्याचा आरोप