नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. मात्र, अशातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. त्यामुळं महायुतीच्या बैठका रखडल्या आहेत. तसंच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी भूमिका स्पष्ट केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर पार पडणार असल्याची माहिती दिली. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.
देवेंद्र फडणवीस होणार 'मुख्यमंत्री'? : 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्याच दिवशी महायुती सरकार स्थापनेचा दावाही करणार असल्याचं भाजपानं स्पष्ट केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय. तसंच इतर नेत्यांकडून करण्यात येत असलेली विधानं ही चांगल्या पोर्टफोलिओसाठी दबाव निर्माण करण्याचा एक भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आज (3 डिसेंबर) दिल्लीत आहेत. त्यांची आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपा प्रवक्ते काय म्हणाले? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्तेे प्रेम शुक्ला म्हणाले की, "विरोधक काहीही म्हणत असले तरी 'एनडीए'मध्ये सर्वकाही ठरलेलं असतं. यापूर्वीही अनेक ठिकाणी असं घडलंय. उदाहरणार्थ, योगी आदित्यनाथ यांनी दीर्घकाळानंतर शपथ घेतली. तसंच कर्नाटक सरकार निवडून आल्यानंतरही अनेक दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली." संसदेत सुरू असलेल्या गदारोळाबद्दल ते म्हणाले, "प्रत्येक अधिवेशनात अडथळा आणणं हे विरोधकांचं काम आहे. विरोधी पक्षांना जनतेच्या प्रश्नांची चिंता नाही किंवा त्यांना संसदेत कामकाज होऊ द्यायचं नाही, जे मुद्दे संसदीय परंपरेला साजेसे आहेत, त्या मुद्द्यांवर चर्चा होऊ द्यायला सरकार तयार आहे. पण विरोधी पक्षांनी सभागृहात यावे."
ममता बॅनर्जी यांना अचानक हिंदूंसाठी प्रेम : यावेळी बोलत असताना प्रेम शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून बांगलादेशातील हिंदूंसाठी केलेली मागणी फेटाळून लावली. ते म्हणाले की, "ममता बॅनर्जी यांनीच सीएएला विरोध केला होता. आज अचानक त्यांच्या हृदयात हिंदूंबद्दल प्रेम उफाळून आलं. त्यांनी यापूर्वी केलेल्या निषेधाबद्दल माफी मागितली पाहिजे. हिंदू निर्वासितांना बंगालमध्ये पाय ठेवू देणार नाही, असं त्यांनी का म्हटलं होतं? याचंही उत्तर त्यांनी द्यावं."
हेही वाचा -