ठाणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिकाने या कठीण परिस्थितीत देशाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदतीची विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केली असून छोट्यातील छोटी रक्कम देखील सरकार स्वीकारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला साथ देत टोरंट पावर ग्रुपच्या वतीने पंतप्रधान निधीसाठी तब्बल 100 कोटी रुपये देण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
टोरंट पावरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी त्याची अधिकृत माहिती मंगळवारी दिली आहे. यानुसार देशातील महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांची काळजी घेण्यासाठी टोरंट ग्रुपने ही घोषणा केली असून देशातील इतर सर्व व्यवसायांप्रमाणेच साथीच्या रोगाने टोरेंट ग्रुप देखील विस्कळीत झाला आहे. मात्र टोरंट ग्रुपने जनता आणि समाज यांना नेहमीच सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे स्थान दिले आहे. संकटाच्या वेळी, टोरेंट ग्रुप साथीच्या रोगासाठी आणि आपल्या समाजातील गरीब घटकांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर लढा देण्यासाठी तसेच सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असल्याची माहिती बदयानी यांनी दिली आहे.
दरम्यान, 100 कोटींची ही मदत 50 कोटी पंतप्रधान निधीसाठी, तर 50 कोटी रुपये विविध सरकारी उपक्रमांतर्गत विविध शासकीय रुग्णालयांना मोफत आवश्यक औषधे पुरविणे, राज्य सरकार मदत निधीमध्ये योगदान, कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करणाऱ्या तळागाळातील स्वयंसेवी संस्थांना दिले जाणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीइची तरतूद आणि समाजातील दुर्बल घटकांवर कोरोना साथीच्या दुष्परिणाम रोखण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असून लॉकडाऊनच्या संपूर्ण कालावधीसाठी टोरंटच्या कंत्राटदार आणि बांधकाम कामगारांसमवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जाईल आणि संपूर्ण खर्च टोरंट ग्रुप करणार असल्याची माहिती देखील चेतन बदयानी यांनी दिली आहे .